ICAI CA Foundation June Exam 2021: सीए फाऊंडेशनची परीक्षा देणार्‍यांसाठी नियमावलीत शिथिलता; तात्पुरता 12 वीचे अ‍ॅडमीट कार्ड शिवाय अर्ज करण्यास मुभा
Online Application | Photo Credits: Pixabay.com

यंदा कोरोना वायरस संकटामुळे सलग दुसर्‍या वर्षी अनेक परीक्षांच्या नियोजित वेळापत्रकाचे बारा वाजले आहेत. देशभरात काही परीक्षा लांबणीवर तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान यंदा जून महिन्यात होणार्‍या सीए फाऊंडेशनच्या (CA Foundation June Exam) विद्यार्थ्यांसाठी आयसीएआयने (ICAI )एक दिलासा दिला आहे. सध्या या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये आता 12वीचे अ‍ॅडमीट कार्ड (Class 12 Admit Card) अपलोड करण्याबाबत तसेच सीए मेंबर, गॅझेटेड ऑफिसर आणि शिक्षण संस्थाचे प्रमुख यांच्याकडून अर्ज साक्षांकन करण्याबाबत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये नियमांमध्ये ही शिथिलता सध्याची देशातील कोरोना परिस्थिती पाहून घेतली असल्याचं सांगण्यात आले आहे.

काय आहेत महत्त्वाच्या नियमांमधील शिथिलता?

  • सीए फाऊंडेशन परीक्षेचा अर्ज भरताना बारावीचं हॉल तिकीट अपलोड करण्याच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली आहे. देशात स्थिती सामान्य झाल्यानंतर बारावीच्या हॉल तिकीटची झेरॉक्स आयसीएआयच्या पत्त्यावर किंवा foundation_examhelpline@icai.in ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. यासोबत रजिस्ट्रेशन नंबर देखील द्यायचा आहे.
  • सीए मेंबर, राजपत्रित अधिकारी आणि शिक्षण संस्थांचे प्रमुख यांच्याकडून परीक्षा अर्ज साक्षांकित करुन घेण्यामध्येही मुभा देण्यात आली आहे. काही विद्यार्थ्याचे फोटो आणि सही अपलोड केलेले नसतील तर त्यांना जून महिन्यातील फाऊंडेशन परीक्षेची नोंदणी करताना परीक्षा अर्जासोबत आधार कार्ड अपलोड करावे लागेल. कोविड 19 चं संकट शमल्यानंतर उमेदवार घोषणापत्र आणि परीक्षा अर्ज साक्षांकित करुन ईमेल आयडीद्वारे आणि पोस्टानं आयसीएआयला पाठवू शकतात.

(नक्की वाचा: MBBS Exam: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आता जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार एमबीबीएसची परीक्षा; अमित देशमुख यांची माहिती).

दरम्यान सीए फाऊंडेशन जून सत्रासाठी नोंदणीसाठी 4 मे ही अंतिम तारीख आहे. विलंब शुल्कासहीत अर्ज करण्याची शेवटची तारिख 7 मे आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे ते icaiexam.icai.org वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करु शकतात. भारतीय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 1500 रुपये तर परदेशी विद्यार्थ्यांसाठी 325 अमेरिकनं डॉलर भरावे लागतील अशी माहिती देण्यात आली आहे.