देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचा फार मोठा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. गेल्या एक वर्षांपासून शाळा कॉलेजेस बंद आहेत व अनेक परीक्षा पुढे ढकलल्या जात आहे. आता महाराष्ट्रात एमबीबीएसच्या (MBBS) परीक्षा जून महिन्यात होणार आहे. एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी आज सांगितले. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, असे अमित देशमुख याआधी म्हणाले होते.
याआधी 15 एप्रिलला, ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.’ असे देशमुख यांनी सांगितले होते. या परीक्षा पुढे ढकलणेबाबत बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली होती.
आता या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. सध्या राज्यामधील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. काल महाराष्ट्रात कोरोनाचे 66191 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे 450 प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील 350 जणांचा करोनाचा संसर्ग झाला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय)
याच पार्श्वभुमीवर याआधी दहावी बोर्ड परीक्षा (Maharashtra Board SSC Exam 2021) रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आहे. मात्र बारावीच्या परीक्षा होणार आहेत व परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून केली जाणार आहे. तसेच सीबीएससी पाठोपाठ आयसीएसई बोर्डानेही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.