भारतासह (India) संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून प्रतिदिन 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याकरिता सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. मात्र, कोरोना बळींच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात शुक्रवारी तब्बल 779 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे भारताने सर्वाधिक मृत्यु झालेल्या देशांच्या यादीत इटलीला मागे टाकत पाचवे स्थान गाठले आहे. यामुळे संपूर्ण देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
भारतात गेल्या 24 तासात 55 हजार 79 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी 49 टक्के मृत्यु 20 शहरांमध्ये झाले आहेत. यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 38 हजार 871 इतकी झाली आहे. देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 35 हजार 747 इतकी झाली आहे. धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे यातील 18 हजार रुग्णांचा मृत्यु जुलै महिन्यात झाला आहे. हे देखील वाचा- Coronavirus in India: देशाचा कोविड-19 चा रिकव्हरी रेट 64.54 टक्के तर रुग्ण दुप्पटीचा दर 21 दिवसांवर; आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती
कोरोनाने संपूर्ण जगभरात धुमकूळ घातला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 52 हजार 70 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये 91 हजार 263, ब्रिटनमध्ये 46 हजार 84, मेक्सिकोत 46 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ भारताचा क्रमांक लागत आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 35 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे भारत सर्वाधिक मृत्यु झालेल्या देशांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहचला आहे. याआधी पाचव्या स्थानी असलेल्या इटलीत 35 हजार 132 जणांचा मृत्यू झाला आहे.