Congress MLA Imran Khedawala. (Photo Credits: PTI)

आज सकाळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांची भेट घेतलेले काँग्रेसचे आमदार इमरान खेडावाला (Congress MLA Imran Khedawala) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (COVID-19 Tests Positive) आली आहे. खेडावाला हे अहमदाबाद मधील जमालपुर-खाडिया मतदारसंघाचे आमदार आहेत. खेडावाला यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितिन पटेल आणि गृहमंत्र्यांची भेट घेतली होती. खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज झालेल्या बैठकीला खेडावालासह अनेक मंत्री उपस्थित होते. त्यामुळे यातील सर्व मंत्र्याना क्वारंटाईन करण्यात येण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. राज्यातील फोर्ट आणि दानिलिमदा या हॉटस्पॉट ठिकाणी मुख्यमंत्री रुपाणी बुधवारी कर्फ्यू लावणारे आहेत. (हेही वाचा - Corona Update: भारतात कोरोना विषाणूचे थैमान; गेल्या 24 तासात 29 लोकांचा मृत्यू, तर 1 हजार 463 नव्या रुग्णांची नोंद)

दरम्यान, इमरान खेडावाला यांचा मतदारसंघ याच परिसरात येतो. त्यामुळे या भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तू आणि रेशन कसे मिळेल, हे विचारण्यासाठी खेडावाला दानिलिमदा मतदारसंघाचे आमदार शैलेश परमार आणि दरियापुरचे आमदार गयासुद्दीन शेख यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. खेडावाला यांची उपस्थितीती असलेली ही बैठक 15 मिनिटे चालली. यावेळी सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कसा करण्यात येईल, यावर मुख्यमंत्री रुपाणी यांच्यासोबत चर्चा केली. विशेष म्हणजे या बैठकीत खेडावाला यांनी मास्क लावला नव्हता. त्यामुळे खेडावाला यांच्यापासून बैठकीला उपस्थित असणाऱ्यांना संक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.