Coronavirus: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने मास्क (Mask) आणि सॅनिटाझरच्या (Sanitizer) वाढत्या किंमती निश्चित केल्या आहेत. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान (Ram Vilas Paswan) यांनी शुक्रवारी ट्विट करत ही माहिती दिली. 200 मिली सॅनिटायझरची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही. तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत 2 आणि 3 प्लाय मास्कमध्ये वापरल्या जाणाऱ्या कपड्याची किंमत 12 फेब्रुवारी 2020 रोजी जशी होती तशीच राहणार आहे. तसचं 2 प्लाय मास्कची किरकोळ किंमत 8 रुपये आणि 3 प्लाय मास्कची किंमत 10 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही, असेही राम विलास पासवान यांनी सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध असणार आहे.
सध्या बाजारात विविध प्रकारचे मास्क आणि सॅनिटायझर विक्रीसाठी येत आहेत. यातील काही सॅनिटायझर बनावट असल्याचंही समोर आलं आहे. तसेच मास्क आणि सॅनिटायझरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती निश्चित केल्या आहेत. (हेही वाचा - Coronavirus In India: कोरोना व्हायरसग्रस्तांचा भारतातील आकडा 258; महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण)
दरम्यान, राम विलास पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅनिटायझरसच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. सॅनिटायझरच्या 200 मिली बॉटलची किरकोळ किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. येत्या 30 जून 2020 पर्यंत या किंमती देशभर लागू राहतील, असेही पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 258 वर पोहचला आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 63 वर पोहचली आहे.