‘बुलबुल’ चक्रीवादळाने (Bulbul Cyclone) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) प्रचंड नुकसान केलं आहे. या वादळामुळे बंगालमधील सुमारे 5 लाख घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच 23 हजार 811 कोटींचं नुकसान झालं आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालमधील 3 जिल्ह्यांना बसला आहे. त्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. राज्य सरकारने शनिवारी ‘बुलबुल’ चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीबाबत केंद्र सरकारला अहवाल पाठवला आहे. (हेही वाचा - 'बुलबुल' चक्रीवादळाचा प. बंगालला फटका, एकाचा मृत्यू)
शनिवारी केंद्रीय दलाच्या सदस्यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी बुलबुल चक्रीवादळाच्या नुकसानीबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. सरकारकडून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. राज्यात बुलबुल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका 3 जिल्ह्यांना झाला. त्यामुळे एकूण 23 हजार 811 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. याचा थेट 35 लाख लोकांवर परिणाम झाला आहे. या वादळामुळे 5 लाखांहून अधिक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, अशी माहीती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, वादळाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या मदतीवरून राजकारण न करण्याचं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. गेल्या आठवड्यात बुलबुल चक्रीवादळ ओडिशाच्या किनारी धडकले होते. ओडिशा किनारच्या भद्रक जिल्ह्याला बुलबुलचा पहिला तडाखा बसला. त्यामुळे या भागातही प्रचंड नुकसान झाले होते.