'बुलबुल' चक्रीवादळाचा प. बंगालला फटका, एकाचा मृत्यू
चक्रीवादळ Photo credits : ( Photo Credit: ANI )

बुलबुल चक्रीवादळ (Bulbul Hurricane)ओडिशाच्या किनारी धडकले आहे. ओडिशा किनारच्या भद्रक जिल्ह्याला बुलबुलचा पहिला तडाखा बसला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या भागात प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, अंगावर झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या तटवर्ती भागात वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या 'बुलबुल' चक्रीवादळाचा कोलकातावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोलकातामध्ये सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली आहेत. सध्या पश्चिम बंगाल येथे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ आता सागर बेट (पश्चिम बंगाल) आणि खेपुपारा (बांगलादेश) मधून सुंदरबनला पार करत उत्तर-पूर्व भारताकडे जाईल. हवामान विभागाने पुढील तीन तास चक्रीवादळाला गंभीर श्रेणीत ठेवले आहे. त्यानंतर हे वादळ थोडे कमजोर होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. बुलबुल वादळामुळे कोलकाता विमानतळावरील संचालनही 12 तासांसाठी बंद करण्यात आले. रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत विमान वाहतूक बंद होती. याशिवाय किनारपट्टी भागातील 1लाख 20 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. हे देखील वाचा- 'बुलबुल' चक्रीवादळाची तीव्रता वाढली; विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता

एएनआयचे ट्विट-

संबधित परिसरात वादळाचा सामना करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी डिझास्टर रॅपिड अॅक्शन फोर्सच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. भद्रक जिल्ह्यात कालीभांजा डीहा द्वीपाजवळ एक मच्छिमार बोट बुडाल्याचे सांगण्यात येत असून या बोटीतील सर्व मच्छिमारांना वाचवण्यात यश आले आहे.