'बुलबुल' चक्रीवादळाची तीव्रता वाढली; विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता
बुलबुल चक्रीवादळ प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: File Photo)

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘बुलबुल’ चक्रीवादळ (Bulbul Cyclone) अधिक तीव्र झाले आहे. त्यामुळे ओडिशाची किनारपट्टी (Odisha) आणि पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मुसळधार पावसाची शक्‍यता भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) व्यक्त केली.

बुलबुल चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या दिशेने सरकत आहे. परंतु, तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून तेथील सरकारने प्रशासकीय यंत्रणेला आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. तसेच आज दक्षिण गुजरात, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोव्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. (हेही वाचा - Mumbai Rains: मुंबई शहर, उपनगरासह नवी मुंबईत जोरदार पाऊस; सखल भागात पाणीच पाणी)

स्कायमेट ट्विट - 

बुलबुल चक्रीवादळ सध्या 13 कि.मी. वेगाने सरकत आहे. हे चक्रीवादळ आज म्हणजेच शनिवारी अधिक तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे, असे भुवनेश्वर हवामान विभागाचे संचालक एच. आर. विश्वास यांनी म्हटले आहे. या चक्रीवादळामुळे 9 आणि 10 नोव्हेंबरला पूर्व आणि पश्चिम भागांतील सागरी वाहतूक पूर्णत बंद ठेवण्यात आली आहे.

सध्या ‘बुलबुल’ चक्रीवादळाचा वेग किनारपट्टी ओलांडताना ताशी 110 ते 120 असणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.