मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या १७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदीर्घ काळापासून या यादीची प्रतिक्षा होती. ही यादी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विधानसभेसाठी उमेदवारीची दावेदारी करणाऱ्या संभाव्य दिग्गजांचे तिकीटच पक्षाने कापले आहे. प्राप्त माहितीनुसार सुमारे ३५ विद्यमान आमदारांना पक्षाने तिकीट नाकाराले आहे. दरम्यान, भाजप उमेदवारांच्या यादीत महिलांचे प्रमाण बरेच कमी असल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे.
भाजपने जाहीर केलेल्या यादीत सर्वात मोठा धक्का बसला आहे शिवराजसिंह चौव्हाण यांच्या मंत्री माया सिंह यांना. माया सिंह यांचे तिकीट कापण्यात आले आहे. पक्षाने माया सिंग यांच्याऐवजी सतीश शकरवार यांना तिकीट दिले आहे. माया सिंह ग्वालियर पूर्व मतदारसंगातून निवडणूक लढवतात. दरम्यान, भाजपने जाहीर केलेली उमेदवार यादी ही राजधानी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार करण्यात आली आहे.
दरम्यान, मंत्री माया सिंह यांच्याशिवाय गौरी शंकर शेजवार यांचेही तिकीट पक्षाने कापले आहे. दरम्यान, शेजवार यांच्याऐवजी त्यांच्या चिरंजीवांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय नव्यानेच भाजपमध्ये प्रवेशकर्ते झालेले ३ अपक्ष आमदार रुदेश राय यांना सीहोर, मून मून सेन यांना सिवनी आणि कल सिंह भावर यांना झाबुआ येथून उमेदवारी देण्यात आली आहे. अद्याप ५३ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर होणे बाकी आहे. (हेही वाचा, भाजप अध्यक्ष अमित शाह यांना सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा)
शिवराजसिंह चौव्हाण हे गेली १५ वर्षे मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून राज्यशकट हाकत आहेत. गेल्या १५ वर्षात त्यंनी मध्य प्रदेशला भाजपचा गड अशी प्रतिमा उभी करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१५मध्ये मुख्यमंत्री बनलेल्या शिवराज यांनी मुख्यमंत्रीपदाची हॅटट्ट्रीक पूर्ण केली आहे. मात्र, मध्य प्रदेशातील राजकीय वर्तमान स्थिती पाहता काँग्रेसने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या राज्यात २८ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.