भाजप अध्यक्ष अमित शाह यांना सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
भाजप अध्यक्ष अमित शाह (संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

Sohrabuddin Shaikh Case:देशभरात चर्चिल्या गेलेल्या वादग्रस्त सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिलासा दिला आहे. याचिकाकर्त्यांकडे ठोस मुद्दे नसल्याचे सांगित न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने ही याचिका दाखल केली होती.

सन २०१४मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने अमित शाह यांना सोहराबुद्दीन शेख प्रकरणातून दोषमुक्त केले होते. मात्र, सीबीआयने या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयाद दाद मागितली होती. दरम्यान, ‘बॉम्बे लॉयर्स असोसिएशन’ने मुंबई हायकोर्टात सीबीआयच्या या भूमिकेविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेत सीबीआयला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे आदेश द्यावे,अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, ही याचिकाच न्यायालयाने फेटाळून लावल्याने अमित शाह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा, राम मंदिर: गरज पडल्यास पुन्हा आंदोलन उभारु; न्यायालयानेही लोकभावनेचा आदर करावा:आरएसएस)

गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसर बी यांना पकडल्याचा आरोप होता. गुजरात पोलिसांनी दावा केला होता की, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि साहरोबुद्दीन यांचे घनिष्ठ संबंध होते. दरम्यान, नोव्हेंबर २००५मध्ये गांधीनगरजवळ झालेल्या एका चकमकीत सोहराबुद्दीन ठार झाला. ही चकमक झाली तेव्हा अमित शाह हे तत्कालीन गृह राज्यमंत्री होते. ही चकमक बनावट होती व त्यात अमित शाह यांचा हात असल्याचा आरोप होता. दरम्यान, या प्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात न्यायालयाने अमित शाह यांना २०१४मध्ये आरोपमुक्त केले होते. आता मुंबई उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळून लावल्याने अमित शाह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.