![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/11/joshi-380x214.jpg)
मुंबई: अयोध्येत राम मंदिर व्हावे ही देशातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर उभारले जावे. मात्र, त्यासाठी न्यायालयानेही लोकभावनेचा आदर करावा, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्यक्त केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी मुंबई येथे शुक्रवारी (२ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे मत व्यक्त केले. मुंबईतील भाईंदर येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आरएसएसची बैठक गेली तीन दिवस सुरु होती. आज या बैठकीचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिनी आरएसएसने पत्रकार परिषद घेऊन राम मंदिर आणि केरळमधील शबरीमाला मंदिरारुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केले.
अयोध्येतील राम मंदिर हा कोट्यवदी जनतेच्या आस्थेचा विषय आहे. मात्र, त्याबाबतचा खटला न्यायालयात सुरु आहे. त्याचा निकाल लागालयला हवा. त्यासाठी कायदाही बनविण्यात यावा असे भय्याजी जोशी म्हणाले. राम मंदिर आयोध्येतील ठरलेल्या जागीच होईल, असेही जोशी म्हणाले. दरम्यान, केरळमधील शबरीमाला मंदिराबाबत विचारलेल्या प्रश्नावर काही परंपरा या पूर्वंपार चालत आल्याने त्याचे पालन करायला हवे. न्यायालयानेही जनभावनेचा आदर कारवा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
दरम्यान, अयोध्याप्रश्नी न्यायालय योग्य वेळी निर्णय देईल. न्यायालयाचा निर्णय यायला विलंब होत आहे. ही बाब नक्कीच वेदनादाई आहे. पण, गरज पडल्या अयोध्याप्रश्नी पुन्हा आंदोलन उभारले जाईल असेही भय्याजी जोशी म्हणाले. (हेही वाचा, राम मंदिरप्रश्नी गुफ्तगू? मध्यरात्री मुंबईत दाखल झालेल्या अमित शाह यांची मोहन भागवत यांच्यासोबत चर्चा)
दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या अंतर्गत गोटात महत्त्वपूर्ण हालचाल सुरु असल्याची चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे मध्यरात्री दोन वाजता मुंबईत दाखल झाले. त्यांनी भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत उपस्थिती लावली. याच ठिकाणी आज सकाळी अमित शाह आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात सूचक चर्चा झाली. या वृत्तामुळे संघ आणि भाजपतील गोटात सुरु असलेल्या हालचालीच्या वृत्ताला बळकटी मिळत आहे. या चर्चेदरम्यान अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावर आरएसएसची भूमिका काय याबाबतही चर्चा झाली. तसेच, या भूमिकेबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठीच अमित शाह मुंबईत आले असावेत अशी चर्चा आहे.