भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या अंतर्गत गोटात महत्त्वपूर्ण हालचाल सुरु असल्याची चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे मध्यरात्री दोन वाजता मुंबईत दाखल झाले. त्यांनी भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत उपस्थिती लावली. याच ठिकाणी आज (गुरुवार, २ नोव्हेंबर) सकाळी अमित शाह आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात सूचक चर्चा झाल्याची माहिती आहे. या वृत्तामुळे संघ आणि भाजपतील गोटात सुरु असलेल्या हालचालीच्या वृत्ताला बळकटी मिळत आहे.
मुंबईतील भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक सुरु आहे. या बैठकीत देशातील विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावर आरएसएसची भूमिका काय याबाबतही चर्चा झाली. तसेच, या भूमिकेबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठीच अमित शाह मुंबईत आले असावेत अशी चर्चा आहे. दरम्यान, शबरीमाला मंदिर आणि आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबाबतही भागवत आणि शाह यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. (हेही वाचा, विहिंपकडून ७० ट्रक दगडांची ऑर्डर; अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या हालचालींना वेग)
दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या वेळी ते अयोध्येतील राम मंदिराबाबत आरएसएसची भूमिका मांडण्याची शक्यता आहे.