Bihar: बिहारमधील नवादा जिल्ह्यात बुधवारी रात्री गुंडांनी दलित समाजातील काही नागरिकांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करून सुमारे 80 घरांना आग लावली. मात्र, जवळपास 25 ते 30 घरे जळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या गंभीर घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवादा येथील मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील नानौरा गावाजवळील कृष्णा नगर दलित वसाहतीत ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार या घटनेचे मूळ जमिनीचा वाद आहे. दोन्ही पक्षांमधील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाने बुधवारी हिंसक वळण घेतले. दलित कुटुंबांचा मोठा भूखंड ताब्यात असल्याचे सांगण्यात येत असून, त्यावरुन दुसऱ्या पक्षाशी वाद सुरू होता. हे देखील वाचा: Weather Forecast : यागी चक्रीवादळामुळे देशातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वादातून हाणामारी होऊन दलित वसाहतीत गुंडांनी हल्ला केला. गुंडांनी केवळ गोळीबारच केला नाही तर अनेक घरांनाही आग लावली. घटनेची माहिती मिळताच नवादा सदर सर्कल ऑफिसर विकेश कुमार सिंह आणि मोफसिल पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेतला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गावात कॅम्प लावण्यात आला आहे. या घटनेनंतर पुढील हिंसक घटना घडू नये म्हणून परिसरात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गुंडांनी अचानक त्यांच्या घरावर हल्ला करून त्यांना मारहाण करून घरांना आग लावल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या हल्ल्यामुळे अनेक लोक बेघर झाले आहेत. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर प्रशासन कारवाईत आले आहे. परिसरात तणाव वाढल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.