Photo Credits: File Photo & twitter account of Police

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये मागील आठवड्यात एका डॉक्टर मुलीवर सामूहिक बलात्कार (Hyderabad Rape Case) करण्यात आला होता. त्यानंतर तिची जाळून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणाचा संपूर्ण देशभरातील जनतेने संताप व्यक्त केला होता. देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलाच्या सुरक्षिततेसाठी नागपूर, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि मुझफ्फरनगर पोलिसांनी भयानक शांतता पसरलेल्या रस्त्यावर अडकेलेल्या महिलांना घरापर्यंत पोहचवण्यास मदतकार्य सुरू केले आहे. निर्मुष्य ठिकाणी अडकलेल्या महिलांना पोलिसांकडून 'होम ड्रॉप' सेवा (Home Drop Service) पुरवण्यात येत आहे. (हेही वाचा - हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर करणारे पोलिस सिंघम वी.सी. सज्जनार कोण आहेत; जाणून घ्या)

महिलांच्या सुरक्षिततेसाठी आंध्र प्रदेशमधील ओनगोल, चिराला, कंदकुर आणि मर्कापूर याठिकाणी रात्री होम ड्रॉप सेवा देण्यात येत आहे. लवकरच इतर शहरातही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सिद्धार्थ कौशल यांनी दिली आहे. मुजफ्फरनगर पोलिस अधीक्षक अभिषेक यादव यांनी सांगितले की, शहरामध्ये अनेक महिला किंवा तरुणी रात्री-अपरात्री कामावरुन घरी येतात. त्यांना कोणत्याही प्रसंगी मदतीची गरज भासू शकते. त्यामुळे त्यांना सुरक्षित घरापर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. यावेळी महिला पोलीसदेखील त्यांच्यासोबत असतील, असंही यादव यांनी सांगितलं.

हेही वाचा - हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

महाराष्ट्रात नागपूर पोलिसांनी ही सेवा सुरू केली आहे. या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना नागपूरचे पोलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी सांगितले की, महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पोलिसांकडून ठाम पाऊले उचलणे गरजेचे आहे. आता महिलांना रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत 100 क्रमांकावर कॉल करुन आपल्या घरापर्यंत पोहचता येणार आहे, असं उपाध्याय यांनी सांगितलं.