देशात तेलबियांचा पेरा घटला; कांदा, बटाट्यानंतर खाद्यतेलाच्या किंमतीत प्रतिलिटर 20 रुपयांची वाढ
Cooking oil (PC -Pixabay)

यंदा देशात ओल्या तसेच कोरड्या दुष्काळामुळे तेलबियांचा पेरा कमी झाला आहे. त्यामुळे तेलबियांच्या उत्पादनात घट झाली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच आता खाद्यतेलाच्या किंमती प्रतिलिटर 20 रुपयांनी वाढल्या आहेत. खाद्यतेल हा स्वयंपाकातील महत्वाचा पदार्थ असतो. किचनमध्ये खाद्यतेलाशिवाय जेवण बनवता येत नाही. प्रत्येक घरामध्ये थोड्याफार प्रमाणत खाद्यतेलाचा वापर केलाच जोतो. घरातील अनेक पदार्थ तेलाशिवाय बनत नाहीत. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढल्यामुळे गृहिणींच्या बजेटवर परिणाम होतो. यावर्षी खाद्यतेलाचे भाव नवनवीन उच्चांक गाठत आहेत. सध्या करडीच्या तेलाची 220 रुपये लिटरने विक्री होत आहे. पामतेल, सोयाबीन, शेंगदाणा व सरकी तेलाचेही दर वाढले आहेत. खरीप हंगामात पिकांना बसलेला फटका व विदेशी पामतेलाचा देशातील कमी झालेला साठा यामुळे खाद्यतेल महागले आहे.

दिल्ली व्हेजिटेबल ऑइल ट्रेडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष हेमंत गुप्ता यांनी भारतात खाद्यतेलाच्या किंमती वाढण्यामागचे कारणे सांगितली आहेत. भारत इंडोनेशिया, मलेशिया आणि अर्जेंटिना या 3 देशांमधून खाद्यतेलाची आयात करतो. यातील अर्जेंटिना देशाने निर्यात शुल्क 25 टक्क्यांवरून वाढून 30 टक्के केले आहे. तर भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 3 रुपयांनी कमकुतव झाला आहे. तसेच इंडोनेशिया आणि मलेशियाने बायो डिझेलसाठी तेलबियाचा वापर करणे सुरू केले आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव 5 ते 7 टक्क्यांनी वाढले आहेत. भारताला या देशांकडून जास्त किंमतीत खाद्यतेलाची खरेदी करावी लागत आहे.

हेही वाचा - Onion Price Hike: कांदा न खाल्ल्याने कोणी मरत नाही उलट वाढत्या दराचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे - बच्चू कडू

भारतात विविध देशामधून खाद्यतेलाची आयात केली जाते. कृषीमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात खाद्य तेलाचा वार्षिक वापर 253.8 लाख टन आहे. परंतु, या तुलनेत उत्पादन केवळ 105 लाख टन एवढंच आहे. त्यामुळे परदेशातून 40 टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते. सध्या तेलाची किंमती कमी होण्याची शक्यता अतिश कमी आहे. उत्पादन वाढवल्यास खाद्यतेलाच्या किंमती कमी होऊ शकतात, असं गुप्ता यांनी सांगितलं.

खाद्यतेलामध्ये करडी तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या महिन्यात करडी तेलाच्या दराने द्विशतक गाठले आहे. सध्या करडी तेल 220 रुपये लिटरने विक्री होत आहे. नवीन करडी बाजारात येण्यास आणखी 2 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. परंतु, तोपर्यंत करडी तेलाच्या किंमती प्रतिलिटर 250 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.