जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले तरी कोणाला काही फरक पडत नाही, कोणी त्याचा विरोध करत नाही पण आज कांद्याचा भाव वाढत असताना सर्वांच्या चर्चेला ऊत आला आहे, वास्तविक कांदा न खाल्ल्याने कोणीही मरत नाहीये.. उलट शेतकऱ्याला चार पैसे अधिक मिळून फायदा होत आहे मात्र याचा सर्वांना त्रास होत आहे. अशी भूमिका आज आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी पुणे (Pune) येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना मांडली आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावात (Onion Rates) होणाऱ्या सातत्यपूर्ण वाढीनंतर आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी कांदा पूजन केले यानंतर उपस्थितांना संबोधित करता असताना त्यांनी कांदा वाढीतून शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचा आनंद व्यक्त केला.
बच्चू कडू यांनी भाषणात मांडलेल्या मुद्द्यांनुसार, कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी लवकरच सरकारकडून कांद्याची आयात केली जाणार आहे, असे झाल्यावर देशात इतका कांदा स्वस्त दरात उपलब्ध होईल कि अक्षरशः हा कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येईल. पण नागरिकांनी तोपर्यंत धीर धरायला हवा. यंदा झाल्या अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादनावर परिणाम झाला, कांडा बाजारातून कमी झाल्याने परिणामी किंमती वाढल्या जर का या वाढीव किमतीची इतकी झळ बसत असेल तर सरकारने स्वतः कांदा विक्री सुरु करावी असा सल्ला सुद्धा कडू यांनी दिला.
दरम्यान, सध्या एनएएफईडी यांच्याकडील कांद्याचा स्टॉक संपला आहे. राज्यात विविध ठिकाणी कांद्याचे दर 120 ते 150 रुपयांवर जाऊन पोहचले आहेत. बाजारात कांद्याचे दराने शंभरी पार केली आहे. यामुळे ग्राहकांकडून वाढलेल्या कांद्याच्या किंमतीमुळे संताप व्यक्त केला जात आहे. मात्र कांदा भाव वाढीमुळे शेतकऱ्याला चार पैसे मिळत आहेत यामुळे जर का काही आत्महत्या कमी झाल्या तर ही आनंदाचीच वार्ता म्हणता येईल असे सांगत बच्चू कडू यांनी सुरु असणाऱ्या कांदा दरवाढीचे समर्थन केले.