School On Wheels In Chhattisgarh's Koriya: छत्‍तीसगडमधील शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी घरासमोर आणली शाळा; पहा फोटोज
Teacher Conducts 'Mohalla' Classes On Motorcycle (Photo credits: ANI)

School On Wheels In Chhattisgarh's Koriya: भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. परंतु, ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांना इंटरनेट प्रोब्लेममुळे तसेच अॅन्ड्राईड मोबाईलच्या अनुपलब्धतेमुळे अडचणींना सामोर जाव लागत आहे.

अशा विद्यार्थ्यांसाठी छत्तीसगडमधील एका शिक्षकाने खास सोय केली आहे. या शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी घरासमोर शाळा आणली असून गरीब मुलांसाठी त्यांनी मोहल्ला क्लासेस (Mohalla Classes) सुरू केले आहेत. रुद्र राणा असं या शिक्षकाचं नाव आहे. राणा हे छत्‍तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचे शिक्षक आहेत. (हेही वाचा - Coronavirus Update: भारतात कोरोनाचा हाहाकार! देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 54 लाखांच्या पार, मृतांचा आकडा 86 हजारांच्या वर)

रुद्र राणा हे आपल्या मोटारसायकलला एक ब्लॅकबोर्ड लावून ते प्रवास करतात आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतात. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाविषयी माहिती देताना रुद्र राणा यांनी सांगितलं की, 'कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. तसेच स्मार्टफोन नसल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाईन क्लास अटेंड करू शकत नाही. अशात मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शिकवण्याचा विचार माझ्या डोक्यात आला. अत्यंत कमी मुलं ऑनलाईन क्लासला हजेरी लावतात. त्यामुळे मोहल्ला क्लास सुरू केला. या क्लासमध्ये आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरासमोर जाऊन मी त्यांना शिकवतो. यावेळी माझ्याकडे ब्लॅकबोर्ड, पुस्तकं आणि प्लेकार्डसदेखील असतात. मी घंटा वाजवतो आणि मुलं शाळेप्रमाणे हजर होतात, असंही राणा यांनी सांगितलं आहे.