निसर्गाचा चमत्कार! 6 महिन्यांच्या बाळाच्या पोटातून काढला 250 ग्रॅम वजनाचा गर्भ; ऑपरेशननंतर मुलाची प्रकृती स्थिर
Representational Image | (Photo credits: PTI)

बिहारमधील (Bihar) प्रतिष्ठित रुग्णालय पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (PMCH) एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बाल विभागात बुधवारी, साडेसहा महिन्यांच्या बाळाचे यशस्वी ऑपरेशन करून, त्याच्या पोटातून मृत गर्भ (Dead Fetus) काढून टाकण्यात आला. इरफान असे या मुलाचे नाव असून, या मुलाच्या पोटातून पाऊण किलो वजनाचा गर्भ काढून इरफानला नवीन जीवन दिले गेले आहे. पीएमसीएच येथील शिशु विभागाचे सर्जन डॉ. अमरेंद्र कुमार यांनी आयएएनएसला याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, 'सुमारे साडेसहा महिन्यांच्या मुलाच्या पोटात 250 किलोग्रॅम वजनाचा गर्भ होता. बालरोग विभागाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर, नवजात मुलावर यशस्वी ऑपरेशन करून हा गर्भ काढला गेला.

या बाळाच्या पोटात गर्भ दिवसेंदिवस वाढत होता. जेव्हा हे मुल दोन महिन्यांचे झाले, तेव्हा मुलाचे पोट फुगू लागले. इरफानच्या पोटात ट्यूमर असल्याचे सांगून बक्सरच्या डॉक्टरांनी पीएमसीएच रेफर केला. पाच लाखांपैकी एक मुलाबाबत अशी घटना पाहायला मिळते. सहसा अशा परिस्थितीत गर्भ जास्त विकसित होऊ शकत नाही, परंतु या गर्भामध्ये हात, पाय, पोट इत्यादी अवयव देखील तयार झाले होते. मात्र हा बाहेर काढलेला गर्भ आधीच मृत झाला होता. (हेही वाचा: ब्राझीलमध्ये मृत महिलेच्या गर्भाशय दानातून गोंडस चिमुकलीचा जन्म, वैद्यकीय इतिहासातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया)

या मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारीला ते आपल्या मुलासह रुग्णालयात आले होते. त्यावेळी मुलाच्या सिटी स्कॅननंतर त्याच्या पोटातील ट्यूमरच्या आत गर्भ दिसून आला. जेव्हा ही बातमी पीएमसीएचमध्ये पसरली, तेव्हा तेथे मुलाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. या यशस्वी ऑपरेशननंतर बाल विभागाच्या एचओडीने त्यांच्या टीमच्या कठोर परिश्रमांचे आभार मानले आहेत. सध्या ऑपरेशननंतर मुलाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, पुढील 48 तास मुलासाठी खूप महत्वाचे आहेत.