Asaduddin Owaisi l (Photo Credits: Facebook)

Asaduddin Owaisi Attack: लोकसभा खासदार आणि एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी रविवारी हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने 101 बकऱ्यांचा बळी दिला. विशेष म्हणजे बकऱ्यांच्या बलिदानासाठी याठिकाणी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मलाकपेटचे आमदार आणि एआयएमआयएम नेते अहमद बलाला यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. उत्तर प्रदेशातील मेरठहून दिल्लीला निघालेल्या खासदार ओवेसी यांच्या गाडीवर गोळी झाडल्यानंतर काही दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, गोळीबार करणारा आरोपी पळून गेला होता.

दरम्यान, 3 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख ओवेसी यांचे समर्थक त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने असदुद्दीन ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा मंजूर केली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली. (वाचा - Gorakhpur: लेडी डॉनने दिली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोरखनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी)

ओवेसी यांच्यावरील हल्ल्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या हल्ल्यानंतर दोन आरोपींना अटक करून 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या हल्ल्यात आणखी अनेक जण सहभागी असल्याची भीती व्यक्त होत आहे. हापूरमध्ये अखिल भारतीय AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेली शस्त्रे मेरठमधून आणण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.

गाझियाबादमध्ये ओवेसी यांच्या गोळीबाराचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. यात दोन अज्ञात तरुण AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. ओवेसी यांनी सर्वप्रथम ट्विट करून या घटनेची माहिती दिली. दिल्ली-लखनौ एक्स्प्रेस वेच्या छिजारसी टोल प्लाझा येथे ही घटना घडली.

ही संपूर्ण घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दिसत होते. एकाने लाल हुडी घातली होती आणि एकाने पांढरा शर्ट आणि पॅन्ट घातली होती.