लवकरच येणार अटल बिहारी वाजपेयी यांचे चित्र असलेले 100 रुपयांचे नाणे
अटल बिहारी वाजपेयी (Photo Credits: Facebook)

नोटबंदीनंतर देशाची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बदलून गेली. नोटांचे, नाण्यांचे विविध प्रकारे हस्तांतरण झाले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने 2000, 500, 200 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या, दहा रुपयांचे नवे नाणे बाजारात आले. आता लवकरच देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे चित्र असलेले 100 रुपयांचे नाणे सरकार चलनात घेऊन येणार आहे. त्याबद्दल काल अधिकृत घोषणा करण्यात आली. 25 डिसेंबर हा अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस त्यानिमित्त सरकार हे नाणे घेऊन येत आहे.

या नाण्याचे वजन तब्बल 35 ग्रॅम इतके असेल. नाण्याच्या एका बाजूला वाजपेयी यांचे नाव आणि चित्र असेल. नाव इंग्रजी आणि देवनागरी भाषेत असेल. याचसोबत नाण्यावर 1924 आणि 2018 असे अटलजींचे जन्मसाल आणि निधनाचे वर्षही नोंदवले असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभ असेल, त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल.

हे नाणे रोजच्या देवाणघेवाणीसाठी वापरात येणार नाही. नाणे खरेदी करण्यासाठी आधी बुकिंग करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही हे नाणे विकत घेऊ शकता.