तेजश्री प्रधान आणि निवेदिता जोशी (Photo Credit : Zee Marathi)

झी मराठीच्या (Zee Marathi) मालिकांचा दर्जा खालावत असल्याची तक्रार होत असतानाच, ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका सुरु झाली. या मालिकेने अल्पवधीत प्रचंड लोकप्रियता मिळवून, श्री आणि जान्हवी ही जोडी घराघरात पोहचवली. यामध्ये जान्हवीची भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) पुन्हा एकदा नव्या मालिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठीने नुकताच ‘अग्गंबाई सासूबाई’ ‪(Aggabai Sasubai‬) या मालिकेचा प्रोमो प्रसिध्द केला असून, हा प्रोमो पेक्षकांना अतिशय आवडल्याचे दिसून येत आहे. तेजश्री प्रधान पुन्हा एकदा आदर्श सुनेची भूमिका साकारत असून, सासूच्या भूमिकेत निवेदिता जोशी-सराफ (Nivedita Joshi-Saraf) असणार आहेत.

लग्न सासूचं....करवली सुनबाई, अग्गंबाई सासूबाई, असे कॅप्शन या प्रोमोला दिले आहे. या प्रोमोमध्ये निवेदिता जोशी सासूच्या भूमिकेत असलेल्या दिसून येत असून, त्यांच्या लग्नाचा प्रसंग या प्रोमोमध्ये दाखवला आहे. मुलीच्या मामाऐवजी सून असलेली तेजश्री प्रधान सासूला मंडपात घेऊन येते. सध्या तरी ही संकल्पना प्रेक्षकांना भावली असून पुढे ही मालिका कसे वळण घेते हे पाहणे औतुक्याचे ठरणार आहे. (हेही वाचा: टीव्ही शो 'तारक मेहता... मध्ये परत येणार नाही तुमची लाडकी दयाबेन, ही अभिनेत्री घेणार तिची जागा)

दरम्यान, 'तुला पाहते रे' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून, नवी ‘अग्गंबाई सासूबाई’ 22 जुलै पासून रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या रात्री साडेआठ वाजता खरं तर रात्री साडेआठ स्लॉट खूप महत्त्वाचा मानला जातो. 'स्टार प्रवाह'वर 'जिवलगा', 'सोनी मराठी'वर 'कोण होणार करोडपती', 'कलर्स मराठी'वर 'घाडगे अँड सून', तर 'झी युवा'वर 'फुलपाखरु' या मालिका सुरु आहेत. त्यामुळे या मालिकांना टक्कर देण्यासाठी झी मराठीने कंबर कसल्याची दिसून येत आहे.