Amitabh Bachchan receives Dadasaheb Phalke Award(PC-ANI)

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) प्रदान करण्यात आला आहे. अमिताभ यांच्या चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना या सर्वाच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अमिताभ यांची पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनीही उपस्थिती लावली होती.

बिग बींना त्यांच्या प्रकृतीमुळे 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर हँडलवर पोस्टही लिहिली होती. त्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अमिताभ यांना दादा साहेब फाळके हा पुरस्कार 29 डिसेंबर रोजी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, आज राष्ट्रपतींच्या हस्ते बिग बींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अमिताभ यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी ते म्हणाले, 'मला या सर्वाच्च पुरस्कारासाठी पात्र समजलं. त्याबद्दल मी भारत सरकार, माहिती प्रसारण मंत्रालय आणि निवड समितीचे आभार मानतो. आई वडिलांचे आशीर्वाद आणि जनतेच्या प्रेमामुळे मला अनेक चित्रपटांमध्ये काम करता आलं. मी नम्रतेने हा पुरस्कार स्वीकारत आहे. या पुरस्कारासाठी माझ्या नावाची घोषणा करण्यात आली तेव्हा मला वाटलं, हा पुरस्कार कशाचा संकेत आहे? आता भरपूर काम झालं, आता घरी बसा, असा संदेश यातून द्यायचा असेल का? परंतु, मला अजून भरपूर काम करायचं आहे,' असंही यावेळी अमिताभ यांनी ठासून सांगितलं. (हेही वाचा - सलमान खानने Bigg Boss मध्ये होस्ट म्हणून पूर्ण केली 10 वर्षे; आतापर्यंतच्या प्रवासाचा व्हिडीओ पाहून भाईजानच्या डोळ्यात पाणी (Video))

1969 पासून 'दादासाहेब फाळके पुरस्कार' देण्यास सुरुवात झाली. भारतीय सिनेमाचे जनक धुंडीराज गोविंद फाळके यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. 10 लाख रुपये रोख, शाल आणि मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 2017 मध्ये दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.