Dr Amol Kolhe (Photo Credits: Twitter)

आज सकाळपासूनच अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) शिवसेनेला (Shiv Sena) जय महाराष्ट्र म्हणणार अशी चर्चा रंगली होती. अखेर संध्याकाळी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये (NCP) प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली आहे. अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबतच जालन्याचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

ऐतिहासिक मालिकांमधुन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांमुळे डॉ. कोल्हे घराघरामध्ये पोहचले आहेत. राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश मिळवला असला तरीही आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये ते निवडणूकींच्या रिंगणात उतरणार का? याबबात अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

डॉ. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

लवकरच लोकसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांची पक्षांतर्गत भांडणं, वाद बाहेर पडत आहेत. अनेकांनी निवडणूकीची तिकिटं न मिळण्याच्य आशेवरून पक्ष बदलायला सुरूवात केली आहे. यामध्ये कलाकार मंडळीदेखील मागे नाहीत. काही दिवसांपूर्वी आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या अभिनेत्रींनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांची स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकरत असलेल्या डॉ. कोल्हेंना रसिकांचं उत्स्फुर्त प्रेम मिळत आहे. मालिकेतून मिळणारी लोकप्रियता आगामी निवडणूकांमध्ये कशी कॅश केली जातेय? हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.