राज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) फटका सामान्य नागरिक, नेते मंडळी यांच्यासोबत चित्रपट तसेच मालिका सृष्टीमधील मंडळींनाही बसला आहे. नुकतेच अभिनेत्री आशालता यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन झाले होते, त्यानंतर चित्रीकरण थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता झी मराठीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त मिळत आहे. याबाबत झी मराठीने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, यामध्ये निवेदिता सराफ यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.
या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, ‘नुकतीच मी माझी कोरोना व्हायरसची चाचणी केली व दुर्दैवाने ती सकारात्मक आली आहे. तसे पाहायला गेले तर माझ्यामध्ये काहीच लक्षणे दिसली नव्हती. मी अगदी ठणठणीत अवस्थेत 12 तास शुटींग करत होते. मात्र मला फक्त थोडी सर्दी झाली होती व थोडे नाक गळल होते. या दरम्यान मला कोणीही कोरोनाची चाचणी करून घेण्याबद्दल सांगितले नाही. मात्र माझ्या आजूबाजूंच्या लोकांचा विचार करून मी चाचणी करून घेतली. 16 सप्टेंबरला मी माझे नमुने दिले व लगेच शुटींग बंद केले. त्यानंतर मी स्वतःला अयसोलेट करून घेतले.’
पहा व्हिडिओ -
पुढे त्या म्हणतात. ‘चाचणीचा रिझल्ट यायला दोन दिवस लागले त्यांनतर मी स्वतः समजून गेले चाचणी सकारात्मक येणार आहे. त्यानंतर 19 सप्टेंबरला माझी चाचणी सकारात्मक आल्याचे बीएमसीने सांगितले. त्यानंतर बीएमसीने माझी सर्व विचारपूस केली व आता मी घरीच वेगळी राहत आहे. त्यांनतर ताबडतोब अशोक सराफ व इतरांची चाचणी झाली. तसेच सेटवरीलही सर्वांची चाचणी झाली व ते सगळे नकारात्मक आले आहे. मला नक्की कुठून हा संसर्ग झाला हे माहित नाही मात्र या महामारीशी लढण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, तसेच जरा जरी शंका आली तर लगेच स्वतःची चाचणी करून घ्या, त्यानेच हा संसर्ग थांबवू शकतो.’ (हेही वाचा: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
दरम्यान, याआधी अलका कुबल निर्मित ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या सेटवर तब्बल 22 जणांना कोरोनाची लागण झाली होती. याच मालिकेच्या सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर साताऱ्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र 22 सप्टेंबर रोजी कोरोना विषाणूविरुद्धची लढाई त्या हरल्या.