'माझ्या वडिलांही हत्या केली गेली, रूग्णालयाविरुद्ध लढणार कायदेशीर लढाई'- अभिनेत्री Sambhavna Seth (See Video)
Actress Sambhavna Seth with her father (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारत सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीशी लढत आहे. या संकटामध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्तींना गमावले आहे. अभिनेत्री संभावना सेठवरही (Sambhavna Seth) असाच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांचे कार्डिअक अरेस्टमुळे 8 मे रोजी निधन झाले. यापूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. आता संभावना सेठने शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने दिल्लीच्या जयपूर गोल्डन रुग्णालयावर वडिलांची ‘मेडिकल हत्या’ केल्याचा आरोप केला आहे. वडिलांच्या मृत्यूसाठी तिने रुग्णालयाला दोषी ठरवले आहे. अभिनेत्रीच्या वडिलांना एप्रिल ते मे दरम्यान कोविड-19 उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

संभावना सेठने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिले आहे की, 'त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली. असे म्हणतात की, जग केवळ काळे आणि पांढरे असू शकत नाही. त्याचप्रमाणे, प्रत्येक डॉक्टर ईश्वरासमान असू शकत नाही. असेही काही वाईट लोक आहेत जे पांढऱ्या कोटच्या आडून आपल्या प्रियजनांचा जीव घेत आहेत.’

संभावना सेठ पुढे लिहिते, 'हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या अवघ्या 2 तासांमध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले किंवा असे म्हणून शकता की, वैद्यकीय पद्धतीने त्यांची हत्या केली गेली. माझ्या वडिलांना गमावणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती होती, ज्याचा मी सामना केला. आता मी निर्भय झाले आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर शिकवलेल्या सत्यासाठी मी संघर्ष करणार आहे. मी माझ्या वडिलांच्या शेवटच्या विधी पूर्ण करत होते. मात्र आता मला या लढाईत तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. कारण मला माहित आहे की, या कठीण काळात तुमच्यापैकी जो कोणी रुग्णालयात राहिला आहे त्या प्रत्येकाला अशाच प्रकारच्या  वैद्यकीय दुर्लक्षाचा सामना करावा लागला आहे. परंतु विविध कारणांमुळे असे लोक लढू शकत नाहीत, मात्र आता आपण सर्वजण लढू शकतो.’

संभावनाने लोकांना #justice4sambhavna #medicalmurder या हॅशटॅगसह व्हिडीओ शेअर करण्याचे आवाहन केले आहे. संभावना सेठने शेवटी लिहिले आहे की, 'माझे वकील रोहित अरोरा आणि कोशिमा अरोड़ा हे दिल्लीच्या सुप्रसिद्ध लॉ फर्ममधील सीनियर असोसिएट्स आहे, ज्यांनी प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच माझे वकील जयपूर गोल्डन हॉस्पिटलला कायदेशीर नोटीस पाठवून कायदेशीर लढाई सुरू करतील.’ (हेही वाचा: ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचं निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

दरम्यान, संभावना सेठच्या वडिलांना कोरोना झाला होता. तिचे वडील आपल्या मुलासह दिल्लीतील पीतमपुरा येथील जयपूर गोल्डन हॉस्पिटलबाहेर खूप वेळ प्रतीक्षा करत होते, मात्र त्यांना रुग्णालयात बेड मिळू शकला नाही. त्यानंतर संभावना सेठला मदतीसाठी सोशल मीडियावर विनवणी करावी लागली होती.