Music Composer Raamlaxman Dies: ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण (Veteran Music Composer Ram Laxman) यांचं निधन झालं आहे. काल रात्री 1 वाजता त्यांनी नागपूर (Nagpur) मध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षांचे होते. आज दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. यांच्या निधनावर कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय पाटील असून ते मुळचे नागपूरचे होते. आपल्या संगीताने त्यांनी मराठीतच नाही तर हिंदी सिनेमांमध्येही गाणी दमदार केली. राम लक्ष्मण या जोडीने तब्बल 92 चित्रपटांना संगीत दिले होते. मराठीत 'पांडू हवलदार', 'तुमचं आमचं जमलं', 'राम राम गंगाराम', 'बोट लावीन तिथं गुदगुल्या' यांसारखे सिनेमे तर 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'मैंने प्यार किया', 'तराना' यांसारख्या हिंदी सिनेमांना त्यांनी संगीत दिले होते.
वयाची वीशी ओलांडल्यानंतर ते मुंबईत आले. आपल्या कलेच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत घवघवते यश मिळवले. मुंबईत आल्यावर त्यांची ओळख बासरी वादक सुरेंद्र हेंद्रे यांच्याशी झाली. या जोडीने सिनेसृष्टीत मोठे योगदान दिले. विजय पाटील यांना घरी लखन म्हणत असल्याने दादा कोंडके यांनी या जोडगोळीचे 'राम लक्ष्मण' असे नामकरण केले. सुरेंद्र हेंद्रे यांच्या निधनानंतर नुसत्या लक्ष्मण नावाने संगीत देणे त्यांना पटले नाही आणि त्यांनी राम लक्ष्मण या नावानेच आपली कारकीर्द चालू ठेवली. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना दोन वर्षांपूर्वी गानसम्राज्ञी लतामंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.