Exclusive: 'तुला पाहते रे' मालिकेतील Gayatri Datar आता नक्की काय करतेय... वाचा तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल
Gayatri Datar (Photo Credits: Instagram)

'तुला पाहते रे' या मालिकेतून मराठी टेलिव्हिजन विश्वाला एक नवा चेहरा मिळाला. तो म्हणजे सर्वांची लाडकी इशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार हिचा .

सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मालिका संपून आता काही महिने उलटले आहेत. अशा वेळी मालिकेच्या सर्वच फॅन्सना प्रश्न पडला असेल की गायत्री आता नक्की काय करतेय?

LatestLY मराठी सोबत साधलेल्या एक्सकॅलुसिव्ह संवादात गायत्रीने तिच्या सध्या सुरु असलेल्या काही प्रोजेक्ट्सबद्दल सांगितले. ती म्हणाली, "सध्या माझ्या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. ते करण्यातच मी इतकी व्यस्त आहे की मला दिवाळी देखील साजरी करता येणार नाही."

गायत्री सध्या 'निम्मा शिम्मा राक्षस' या बालनाट्यात एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. पण तिने अलीकडेच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोसोबत ती लवकरच एक नवा प्रोजेक्ट घेऊन येत असल्याचे सांगितले आहे. पण त्या प्रोजेक्टबद्दल सर्वच माहिती गायत्रीने अजून तरी गुलदस्त्यात ठेवली आहे.

या प्रोजेक्ट बद्दल विचारताच गायत्री म्हणाली, "मी लवकरच त्याबद्दल सांगेन कारण अद्याप तरी मला त्या बद्दल काही सांगायला परवानगी नाही."

टेलिव्हिजनवर मात्र गायत्री पुन्हा प्रेक्षकांना इतक्यात काही दिसणार नाही. ती म्हणाली, "मी ठरवलंय की किमान एक वर्ष तरी मी टेलिव्हिजनपासून दूर राहणार आहे. कारण एखादी मालिका करायची ठरवली की तुम्ही इतके व्यस्त होता की दुसरं काही करताच येत नाही. आणि चित्रपटाचं म्हणाल तर एखाद्या चांगल्या स्क्रिप्टची मी अजूनही वाट बघतेय."

कोण आहे ही सौंदर्या इनामदार? हिचा अक्कासाहेबांशी नक्की संबंध काय? वाचा सविस्तर...

यावरून गायत्रीने हे तर स्पष्ट केलं की ती टेलिव्हिजन किंवा सिनेमातून प्रेक्षकांसमोर इतक्यात तरी येणार नाही. त्यामुळे तिचा हा नवा प्रोजेक्ट एखादी वेब सिरीज किंवा एखादा गाण्याचा अल्बम असण्याची शक्यता आहे.