झी मराठी (Zee Marathi) वरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) हा शो अलीकडच्या भागात प्रसारित झालेल्या एका दृश्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. राजर्षी शाहू महाराज (Shahu Maharaj) आणि सयाजीराजे गायकवाड (Sayajiraje Gaikwad) यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीने करत त्याजागी भाऊ कदम (Bhau Kadam) आणि कुशल बद्रिके (Kushal Badrike) यांचा फोटो मॊर्फ करून लावण्यात आला होता. यावरून महापुरुषांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी निलेश साबळे (Nilesh Sable) यास माफी मागण्यास सांगितले होते. असे न केल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशाराही देण्यात आला होता. मात्र तत्पूर्वीच आज निलेश साबळे याने एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांची प्रकट माफी मागितली आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू या आधी किंवा आता तसेच यापुढे सुद्धा नव्हता आणि नसेल मात्र तांत्रिक बाबीतून झालेल्या चुकीसाठी क्षमस्व असे निलेश याने व्हिडीओ मध्ये म्हंटले आहे.
निलेश साबळे यांनी व्हिडिओतून माफी मागितली आहेच पण त्या सोबतच स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहु महाराजांचा नव्हता असेही स्पष्ट केले. या व्हिडिओवर अद्याप छत्रपती संभाजी राजे यांची प्रतिक्रिया आलेली नाही. ('मी ब्राह्मण नाही...' असं म्हणत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचे दिग्दर्शक सुजय डहाके यांना प्रत्युत्तर )
पहा व्हिडीओ
दरम्यान, हा एपिसोड प्रसारित झाल्यावर या वादाला शाहू महाराज प्रेमींकडून सुरुवात करण्यात आली होती, छत्रपती संभाजी राजे यांनी सुद्धा या एपिसोडमधील दृश्यावर आक्षेप घेत एक ट्विट केले होते, " “लोकप्रियतेची हवा डोक्यात शिरली की माणूस विक्षिप्त वागतो,आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची व पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत," असा आरोप करत झी मराठी आणि निलेश साबळेने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती.