Bigg Boss Marathi स्पर्धक अभिजित बिचुकले यांची अटक झाल्यानंतर प्रतिक्रिया म्हणाले 'माझी अटक म्हणजे ..!'
Abhijeet Bichukale | (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi Season 2 मधील सर्वात चर्चेत आणि तितकेच वादग्रस्त असलेले स्पर्धक अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी 'पोलिसांनी आपल्याला केलेली अटक हे राजकीय कटकारस्थान' असल्याचे म्हटले आहे. गोरेगाव फिल्मसिटीतील 'बिग बॉस' (Bigg Boss) च्या घरात जाऊन सातारा पोलिसांनी बिचुकले यांना अटक केली. चेक बाउन्स (Check bounce) प्रकरणात अभिजित बिचुकले यांना अटक झाली आहे. दरम्यान, ही अटक झाल्यानंतर अभिजित बिचुकले यांनी एका वृत्तवाहिणीला प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले अभिजित बिचुकले?

अभिजित बिचुकले यांच्या हवाल्याने एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की,   'माझ्या विरोधात तक्रार केलल्या संदीप संकपाळ यांच्या घरात गेली 12 वर्षे मी माझ्या कुटुंबासोबत राहतो. भाडे म्हणून ठरलेली रक्कमही आम्ही त्यांना देतो. त्याच्या कुटुंबाचे आणि आमचे कौटुंबिक संबंधही चांगले आहेत. असे असताना त्यांनी इतके जुने प्रकरण का उकरुन काढले हे मला समजू शकले नाही. माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार करणे म्हणजे हे एक राजकीय कटकारस्थानच आहे. माझ्याविरोधात तक्रार करण्यासाठी संदीप संकपाळ यांना भडकवण्यात आले आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठीच हा प्रकार करण्यात आला आहे', असा आरोप अभिजित बिचुकले यांनी केला आहे.

दरम्यान, 'येत्या विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवारी करणार ही काळ्या दगडावरची पांढीर रेघ आहे. पण, ज्यांना मी निवडणूक लढवू नये असं वाटतं त्यांनीच हे कृत्य केलं आहे', असा आरोपही अभिजित बिचुकले यांनी केला आहे. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2 स्पर्धक अभिजित बिचुकले यांना 'बिग बॉस' च्या घरातून अटक; चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात)

अभिजित बिचुकले यांना सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांचा बिग बॉसच्या घरातील पुढील प्रवास कसा असेल याबाबत संधिग्दता आहे. कलर्स वाहिनीनेही अभिजित बिचुकले यांच्याबाबत अद्याप कोणतीही भूमिका व्यक्त केली नाही. त्यामुळे बिग बॉस, अभिजित बिचुकले आणि पोलिस प्रकरण यांच्याबातब अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.