Bigg Boss Marathi 2: अभिजित बिचुकले जामीनासाठी ठोठावणार मुंबई उच्च न्यायालयाचे दार, बिग बॉसच्या घरात एंट्रीबाबत मात्र प्रश्नचिन्ह
Abhijeet Bichukale | (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) सीझनच्या दुसऱ्या पर्वात पहिल्या दिवसापासून ज्या स्पर्धकावर सर्वांचे लक्ष लागून होते तो म्हणजे अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle). मराठी चित्रपट व मालिकांमधील गाजलेल्या चेहेऱ्यांच्या मध्ये हा अस्सल मातीतला बिचुकले डावा दिसून येत होता, "मी महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री होणार" हे त्यांचे ब्रीद वाक्य असो वा घरातील अन्य सदस्यांवर आपल्या स्वलिखित कवितांचा मारा असो त्यांनी नेहमीच आपली खेळी रंजक पद्धतीने पार पाडली होती. मात्र काही दिवसांपूर्वी बिचुकलेना एका चेक बाउंस प्रकरणी अटक करण्यात आली आणि परिणामी त्यांना बिग बॉसचे घर सोडून जावे लागले. या प्रकरणी सातारा सत्र न्यायालयाने बिचुकले यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे आता बिचुकलेने जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे.

अभिजीत बिचुकले ला चेक बाउन्स प्रकरणी 21 जून रोजी बिग बॉसच्या सेटवरून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मिळतो तोवर 22 जून रोजी खंडणीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एस. दातीर यांच्या न्यायालयात बिचुकलेने जामिनासाठी धाव घेतली होती. तिथे 29 जून रोजी जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर आता बिचुकलेने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.खासदार उदयनराजे भोसले ही ज्याला घाबरतात, असा 'बिग बॉस मराठी 2' चा स्पर्धक अभिजीत बिचकुले नेमका आहे तरी कोण? 

दरम्यान, या सर्व कारवाईत बराच वेळ जाणार असल्याने बिग बॉसच्या घरात बिचुकलेच्या एंट्री बाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.