Adwait Dadarkar चा सोशल मीडीयाला कंटाळून Instagram Account ला रामराम
Adwait Dadarkar| PC: Instagram/ adwaitdadarkarofficial

सोशल मीडीया हे दुधारी शस्त्र आहे. सेलिब्रिटींना जितक्या पटापट सोशल मीडीयावर डोक्यावर घेतलं जातं तितक्याच वाईट पद्धतीने ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे. अनेकदा रसिक टीका आणि ट्रोल यामध्ये असणारी पुसट रेषा विसरतात आणि मर्यादा ओलांडून भाष्य करतात. याचमुळे मागील काही दिवसांत कलाकारांनी सोशल मीडीयाला रामराम केल्याचं पहायला मिळालं आहे. या कलाकारांच्या यादीमध्ये आता दिग्दर्शक, अभिनेता अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar) चा समावेश झाला आहे. नुकतंच अद्वैतने आपण सोशल मीडीयाला कंटाळल्याने इंस्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट करत असल्याचं जाहीर केले आहे. यावेळेस त्याने मी अगदी ओके आहे त्यामुळे विचारपूस करायला फोन करू नये तसेच पुन्हा कधि येईन हे माहित नाही असं देखील म्हटलं आहे.

सध्या अद्वैत झी मराठी वर 'अग्गबाई सूनबाई' मालिकेत काहीशी नकारात्मक भूमिका साकारत आहे. या मालिकेतील त्याची भूमिका, अंदाज यावर अनेकांनी नाराजी दाखवली होती. त्यामध्येच आता ही मालिका बंद होणार असल्याचीही चर्चा आहे. पण त्याबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

अद्वैतच्या पूर्वी येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील 'मालविका' साकारणार्‍या आदिती सारंगधरनेही काही काळ इंस्टाग्राम आणि सोशल मीडीयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण अधून मधून आता आदिती अ‍ॅक्टिव्ह दिसत आहे. अभिनेता सुबोध भावेने देखील काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे ट्वीटर ला रामराम ठोकला आहे. नक्की वाचा: Subodh Bhave Deleted Twitter Account: 'काळजी घ्या, मस्त रहा!' असे म्हणत मराठी अभिनेता सुबोध भावे याने ट्विटर अकाऊंट केले डिलीट.

अद्वैत 'अग्गबाई...' पूर्वी ‘माझ्या नवऱ्याची बायको’या मालिकेत सौमित्रच्या भूमिकेत दिसला होता. त्यावेळी त्याने रसिकांची दाद कमावली होती. अभिनयासोबतच अद्वैत दिग्दर्शकही आहे. 'दादा एक गूड न्यूज आहे' या नाटकाचे दिग्दर्शन त्याने केले आहे.