मुंबई: भरपावसात ट्रॅफिक मध्ये अडकलेले अभिनेते भारत गणेशपुरे यांचा मोबाईल लुटुन चोर फरार; फेसबुक वर शेअर केला अनुभव (Watch Video)
Bharat Ganeshpure (Photo Credits: Facebook)

‘चला हवा येऊ द्या’(Chala Hava Yeu Dya) फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure)  हे काही दिवसांपुर्वी भर पावसात, ट्रॅफिक मध्ये अडकलेले असताना एका टोळीने मदतीसाठी खोटंं नाटक करत त्यांचा मोबाईल चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. आपल्याला आलेला हा वाईट अनुभव भारत यांनी फेसबुकला एक व्हिडिओ पोस्ट करुन शेअर केला आहे. मुंंबईतील कांदिवली (Kandivali)  जवळ समतानगर पोलिस स्थानकाच्या (Samata Nagar Police Station)  लगत काही दिवसांपुर्वी जोरदार पावसामुळे भुस्खलन (Land Slide)  सहित दरड सुद्धा कोसळली होती अशावेळी पाऊस सुद्धा तुफान असल्याने बराच वेळ ट्रॅफिक होते याचाच फायदा घेत चोरांनी हा डल्ला मारल्याचे समजत आहे.  पावसामुळे कांदिवलीच्या पश्चिम एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळल्याची घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा Video

भारत गणेशपुरे यांनी पोस्ट मध्ये सांगितले की, “आज माझा मोबाईल अक्षरशः लुटून नेला आहे. ही घटना कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या फ्लाय ओव्हरवर घडली. काल दरड कोसळल्यामुळे तेथे खूप पाऊस होता, खूप ट्रॅफिक होती. त्यावेळी दोन माणसं आली आणि त्यांनी माझी गाडी ठोठावली, मी काच उघडली नाही. मात्र, माझ्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माणसाने कारचा दरवाजा उघडला. त्याक्षणी त्या व्यक्तीने ओकारी काढण्याचं नाटक केलं. त्याचवेळी माझ्या बाजूने एक माणूस आला आणि काच वाजवली. मी त्याच्याकडे पाहिलं, तर तितक्यात ओकारी काढणाऱ्या माणसाने माझा मोबाईल चोरुन नेला.”

“माझ्यासोबत ही घटना घडली आहे. मात्र, तुम्ही सतर्क राहा. सध्या कोरोनाची स्थिती आहे. कोरोनामुळे फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तुमच्यासोबत अशापद्धतीची घटना घडली तर आधी तुमची गाडी बंद (लॉक) करा. काच उघडू नका. या प्रकारात बायका, मुलं, लहान मुलं अशी टोळी असते.पीछे का काच खुला है, मागच्या टायरमध्ये हवा नाही, समोरुन तुमच्या गाडीत स्पार्क होतेय, असे अनेक प्रकार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या गाडीखाली उतरु नका. सुरक्षित ठिकाणी आल्यावर हे पाहा"

भारत गणेशपुरे फेसबुक पोस्ट

दरम्यान, भारत गणेशपुरे यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. तसेच तुम्हला कोणी निर्दयी म्हंटले तरी चालेल पण अशा परिस्थितीत कधीच गाडीची काच खाली करु नका असे आवाहन देखील भारत यांंनी केले आहे.