Star Pravah वर सुरु होत आहे एक नवी कहाणी- ‘रंग माझा वेगळा’ (Watch Promo)
Rang Majha Vegla (Photo Credits: File Image)

'त्या सावळ्या तनूचे, मज लागले पिसे गं...' किंवा 'सावळाच रंग तुझा... ' ही माणिक वर्मांची गाणी आजही ऐकायला तितकीच गोड वाटतात. सावळ्या रंगाच्या प्रतिभेचं अगदी मोजक्या आणि योग्य शब्दात या गाण्यातून वर्णन केलं आहे. साहित्यातून जरी हा सावळा रंग दिमाखात झळकत असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तितक्याच प्रकर्षाने नाकारला गेला किंबहुना आजही नाकारला जाताना दिसतो.

सुंदर दिसणं ही प्रत्येकाची स्वाभाविक भावना आहे, पण सौंदर्याचा संबंध थेट गोरेपणाशी जोडला जातो. याच भावनेतून मग जन्माला येणारं मूल गोरंच हवं इथपासून लग्नविषयक जाहिरातींमध्येही ‘गोरी बायको हवी’ असं ठामपणे सांगितलं जातं. पण सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, आणि मनाचं सौंदर्य चेहऱ्यावर उमटल्याखेरीज रहात नाही. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून हाच विचार मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वर्णभेदाविषयी असलेली मानसिकता बदलायला ही मालिका भाग पाडेल. या मालिकेतील नायिका म्हणजेच दिपाच्या वेगळेपणाच्या प्रेमात तुम्ही नक्कीच पडाल. स्वत:वर भरभरुन प्रेम करणारी दिपा तिच्या गुणविशेषांमुळे प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. दिपाचा हाच वेगळेपणा ‘सौंदर्य म्हणजे गोरेपणा’ ही भ्रामक समजूत असल्याची जाणीव करुन देतो. सौंदर्याची नेमकी व्याख्या काय याचा नव्याने विचार करायला भाग पाडतो. स्टार प्रवाह प्रस्तुत आणि अतुल केतकर यांच्या राईट क्लिक प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे.

पहा मालिकेचा पहिला प्रोमो

या मालिकेच्या वेगळेपणाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘नाही म्हण्टलं तरी आपल्या समाजात वर्णभेद हा आहेच. मालिकेची गोष्ट जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा वाटलं एक सुंदर संवेदनशील कथा सादर करता येईल. लव्हस्टोरीसोबतच रिलेटेबल ड्रामा मांडण्याचा आणि काही ठोकताळे खोडण्याचा प्रयत्न आहे. हल्लीची पीढी याबाबतीत स्वत:ला अजिबात कमी लेखत नाही. त्यामुळेच तर कोणतीही गोष्ट त्यांना प्रगतीपासून थांबवू शकत नाही.’

ही नवी मालिका सुरु होत आहे 30 ऑक्टोबरपासून रात्री 9.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.