60 Glorious Years Of Doordarshan: रामायण ते शक्तीमान, मालगुडी डेज यांच्यासह अनेक लोकप्रिय मालिकांनी 'दूरदर्शन' ने गाजवलं 90 ची दशक
Shows Aired On Doordarshan (Photo Credits: Twitter)

Doordarshan Turns 60:  दूरदर्शन या सरकारी वाहिनीला आज (15 सप्टेंबर) 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1959 साली याच दिवशी दूरदर्शन हे चॅनल लॉन्च करण्यात आलं. हा आधुनिक भारतामधील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. दूरदर्शनचा लोगो ते बातमी वाचनाची पद्धत, सादरीकरणाची पद्धत यामध्ये एक विशिष्ट लय आहे. लोगोदेखील डोळ्याच्या आकाराप्रमाणे दिसतो. ज्याच्याद्वारा आपण सारं जग पाहू शकतो. 90च्या दशकात ज्यांचं बालपण गेलं आहे त्यांच्यासाठी 'दूरदर्शन' चॅनल खास आहे. देशात टेलिव्हिजन क्षेत्रातील सुरूवातीच्या दिवसांमध्ये ज्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी धूम केली आहे त्याच्या आठवणी आजही रसिकांच्या मनात कायम आहेत. आज टेलिव्हिजनवर अनेक चॅनल्स आहेत मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या परिसीमा रूंदावल्या आहेत. पण दूरदर्शनवरील कार्यकरमांची मज्जा काही औरच होती.

शक्तीमान

दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे शक्तीमान. शक्तिमान ही दूरदर्शन मालिका 13 सप्टेंबर 1997 रोजी प्रसारित करण्यात आली. मुकेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका केली होती. शक्तिमान विविध शक्तींचा वापर करून वाईट गोष्टीविरुद्ध लढतो व शेवटी विजय सत्याचाच होतो, या तत्त्वावर जीवन जगतो. शक्तिमान हा दिवसा सर्व लोकांत गुप्त प्रकारे "पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शात्री" या नावाने पत्रकाराच्या भूमिकेत वावरायचा.

मालगुडी डेज

मालगुडी डेज ही RK Narayan यांच्या लघुकथांवर आधारित होती. 1987 मध्ये ती दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आली. मालगुडी या गावातील लहानमुलांची कहाणी मजेशीर पद्धतीने रंगवण्यात आली आहे.

फौजी

आजचा बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याने छोट्या पडद्यावर केलेली फौजी ही मालिका विशेष गाजली.1989 साली आलेल्या या मालिकेत शाहरूख खान लेफ्टनंट अभिमन्यू राय ची भूमिका साकारत होता.

रामायण

25 जानेवारी 1987 साली रामायण दूरदर्शनवर आली. 31 जुलै 1988 पर्यंत रसिकांसोबत रामायण मालिकेने खास बंध बांधला. या मालिकेला पाहण्यासाठी लोक टीव्हीसमोर एकत्र बसायचे. या मालिकेतील प्रमुख कलाकार, अरुण गोविल रामाची भूमिका साकारत होता त्याला अनेक जण राम म्हणूनच पाहत होते.

बुनियाद

दूरदर्शनच्या प्रत्येक सीरीयलमध्ये एक खास वैशिष्ट्य होतं. बुनियादया मालिकेनेही रसिकांच्या मनात खास जागा बनवली आहे. रमेश सिप्पी यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.

दूरदर्शनची सुरूवात दिल्लीमध्ये 1959 साली झाली, त्यनंतर दैनंदिन प्रसारण सुरू करण्यात आलं. 1972 साली मुंबईमध्ये त्याचा विस्तार करण्यात आला. 1975 पर्यंत 7 विविध शहरांमध्ये दूरदर्शनची सेवा सुरू करण्यात आली. आजही लोकं दूरदर्शनवरील कार्यक्रम तितक्याच उत्सहाने पाहतात. मराठी मध्ये डीडी सह्याद्री चॅनल आहे.