स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajyarakshak Sambhaji) ही झी मराठी (Zee Marathi) या वाहिनीवरील मालिका सध्या एका महत्वाच्या वळणावर येऊन पोहचली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, पन्हाळगडावर असलेले संभाजी महाराज रायगडावर आले आहेत. सत्तेसाठी राजकारण करणाऱ्या कारभाऱ्यांचा शंभूराजे काय निवाडा करणार याबाबत सर्वानाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. अनाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, मोरोपंत, सोमाजी या मंडळींनी सोयराबाईंना फूस लावली, महाराजांच्या मृत्युनंतर जाणूनबुजून संभाजी महाराज यांस ती खबर लागू दिली नाही, राजाराम महाराजांचा मंचकारोहण केला, इतकेच नाही तर शंभूराजांच्या अटकेचे आदेशही दिले. अशा एक ना अनेक चुकींचा निवाडा सध्या चालू आहे.
कालच्या भागात (15 जानेवारी), शंभूराजे आणि कवी कलश बंदी असलेल्या कारभाऱ्यांना भेटायला तुरुंगात येतात. कारभाऱ्यांच्या अशा चुकांमुळे शंभूराजांना भोगावे लागलेले हाल ते त्यांच्यासमोर बोलून दाखवतात. शंभूराजांची चूक नसतानाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते, त्यांची फरफट झाली हे शंभूराजे कथन करतात, मात्र हे सगळे सांगताना अनाजी पंत यांची मग्रुरी अजूनही तशीच असल्याचे दिसते. ‘मरणापेक्षा मरणाची वाट पाहणे जास्त भयावह असते’, असे सांगून ही रात्र तुमची शेवटची रात्र असल्याचे संकेतही शंभूराजे देतात. शंभूराजे तिथून बाहेर पडल्यावर घाबरलेले कारभारी, आता संपल सगळे असे म्हणत अनाजी पंत यांना आता पुढे काय करायचे असे विचारतात मात्र त्यावर अनाजी पंत यांच्याकडे काहीही उत्तर नसते. त्यानंतर शंभूराजे कवी कलश यांना बाळाजी आवजी यांना कारभाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्याची तयारी करण्यास सांगावे असे आदेश देतात. मरणाच्या दारात पोहचल्यावर तरी जिवंत राहू अशा एका आशेच्या किरणामुळे कोणी खोटे बोलणार नाही असा शंभूराजेंचा समज यामागे दिसून येतो.
इकडे एकट्या पडलेल्या सोयराबाईंची तगमग शिगेला पोहचलेली आहे. शंभूराजेंच्या अटकेचे आदेश राजाराम महाराज यांच्या सही शिक्क्याचे आहेत, त्यामुळे आपणही या निवाड्यात गोवले जाणार अशी भीती त्यांना जाणवत आहे. आपण या कारभाऱ्यांच्या सांगण्याला कसे भुललो, असे कसे वाहत गेलो याविषयी त्यांचा त्रागा दिसून येतो. मात्र या सगळ्याचे परिणाम भयंकर असल्याचे त्यांच्या लक्षात येते. इतक्यात राजाराम महाराज त्यांच्या महाली येतात. घाबरलेल्या सोयराबाई आपला निवाडा होणार आहे का? याबद्दल काही माहिती आहे का ते विचारतात. मात्र राजाराम महाराज यांना काहीही माहित नसते.
त्यानंतर सोयराबाई यांना यातून सुटण्याचा एक पर्याय दिसतो तो म्हणजे येसूबाई साहेब यांच्याशी बोलणे. दरम्यान स्वतःच्या विचारांचाच गुंता त्या सोडवू शकत नाहीत. आपण असे का केले याची कारणे देऊन त्या स्वतःची समजूत घालू लागतात. मात्र पुतळाबाई अथवा राणूबाई सत्य काय ते शंभूराजेंना सांगतील याची भीतीही त्यांना वाटत असते. शेवटी शेवटचा प्रयत्न म्हणून त्या येसूबाईंची रदबदली करण्यासाठी त्यांच्या महाली जातात.
कवी कलश यांना भेटून शंभूराजे आपल्या महाली जात असता, राणूबाई त्यांच्यासमोर येतात. राणूबाई आरोपपत्र अपूर्ण असल्याचे सांगतात, जे काही घडले त्यावेळी आपण गडावरच होतो त्यामुळे आपलीही साक्ष घ्यावी अशी विनवणी करतात. मात्र ‘घराच्या मंडळींनी या निवाड्यात पडू नये’ असे सांगून शंभूराजे आपल्या महाली परततात.
इतक्यात राजाराम महाराज शंभूराजेंना भेटायला त्यांच्या महाली येतात. सध्या गडावर जे काही चालले आहेत त्याबद्दल आपणास भीती वाटत असल्याचे राजाराम महाराज बोलून दाखवतात. मात्र शिवपुत्राने कोणालाही घाबरू नये, असे संभाजी राजे सांगतात. शेवटी कोणाकोणाचा निवाडा होणार असे राजाराम महाराज शंभूराजेंना विचारता, मात्र ते आपण कोणालाही सांगणार नसल्याचे उत्तर शंभूराजे देतात.
दरम्यान संतापलेल्या राणूबाई येसूबाईंच्या महाली येतात. शंभूराजे आपले काहीच ऐकत नसल्याची त्या तक्रार करतात. ‘आरोपपत्र अपूर्ण आहे, त्यात सोयराबाईंचेही नाव असायला हवे, या सर्वांच्या मागे सोयराबाई मातोश्रींची महत्वाकांक्षा आहे’ हे सांगायला आपण दादासाहेबांकडे गेलो मात्र त्यांनी काही एकून घेतले नाही, असे त्या म्हणतात. मात्र येसूबाई काहीच बोलत नाहीत. हे पाहून राणूबाई अजूनच चिडतात, ‘तुम्ही काहीच का बोलत नाही?’, असा सवाल त्या विचारतात. त्याचवेळी महालात सोयराबाई असल्याचे त्यांच्या निदर्शनास येते. इथे राणूबाई आणि सोयराबाई यांची शाब्दिक चकमक उडते. हे सर्व करण्यास सोयराबाईच जबाबदार आहेत, दाराच्या उंबरठ्याला यांनीच महत्वाकांक्षेची नाळ जोडली, आणि आता याच उंबरठ्याच्या आत या येऊन बसल्या आहेत, अशा शब्दात राणूबाईंचा राग बाहेर पडतो. दरम्यान येसूबाई राणूबाईंना गप्प राहण्याची विनंती करतात, मात्र इतके सगळे घडल्यावर शांत होतील त्या राणूबाई कसल्या. गरज पडली तर सोयराबाईंच्या विरोधात आपण साक्ष देऊ असे त्या म्हणतात. शेवटी नात्याचा आब राखाल अशी अपेक्षा आहे असे म्हणून, डोळे पुसित सोयराबाई तिथून बाहेर पडतात.
जाताना शंभूराजे त्यांना पाहतात, हे अश्रू पश्चातापाचे आहेत, का संतापाचे तुमचे तुम्हालास ठावूक, मात्र सोयराबाईंनी या अडचणी वाढवून ठेवल्या असल्याचे ते म्हणतात.