स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही अभिनेत्री म्हणजे आपल्या वक्तव्य आणि विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारं व्यक्तिमत्व. मग ते पद्मावतच्या शेवटच्या दृश्याबद्दल तिने केलेले ट्विट असेल किंवा अगदी एखाद्या राजकीय व्यासपीठावरून केलेले भाषण असेल, तिच्या अभिनयापेक्षा तिच्या कृतींमुळेच ती नेहमी प्रकाशझोतात येत असते. आताही तिने केलेल्या एका वक्तव्यमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
'सन ऑफ अबिश' नावाचा एक मजेशीर चॅट शो आहे. ज्यात अबिश मॅथ्यू दोन सेलीब्रिटींना बोलावून त्यांच्यासोबत गप्पा मारतो तसेच काही मजेदार खेळही खेळले जातात. याच शो मध्ये स्वरा आली असता, तिने चार वर्षाच्या एका मुलाला शिवी दिल्याचं कबूल केलं आहे. झालं असं की स्वरा तिच्या करियरच्या सुरवातीच्या काळात केलेल्या एका जाहिरातीबद्दल सांगत होती. दाक्षिणात्य भाषेमध्ये ही जाहिरात बनवली जात होती. एका साबणाच्या कंपनीसाठी ती तयार करण्यात येत होती. तिच्यासोबत त्यामध्ये एक चार वर्षाचा मुलगा सुद्धा होता. (हेही वाचा. 'मुघलांनी भारत श्रीमंत केला' या ट्विट वरून स्वरा भास्कर झाली ट्रोल)
याबाबत बोलताना स्वरा सांगते,''माझे अगदी सुरवातीचे दिवस होते. आणि या (शिवी) मुलाने मला आंटी अशी हाक मारली. एकतर पहिल्यादाच कॅमेरा समोर अभिनय करायचं प्रचंड दडपण माझ्यावर होतं. त्या मुलाला लघुशंका करण्यासाठी जायचे होते. त्याने दिग्दर्शकाला हे सांगून पाहिले. परंतु त्याने दुर्लक्ष केल्यावर त्याने मला आंटी अशी हाक मारून हे सांगितले. त्याने आंटी म्हणताच मला राग आला आणि मी त्याला शिवी दिली.''
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे स्वराला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर 'स्वरा आंटी' असा हॅशटॅग वापरून तिला चिडवायलाही सुरवात झाली आहे. तर कायदेशीर अधिकार संरक्षण मंचाने 'बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगा'कडे तिच्याविरोधात तक्रार नोंदवत कारवाईची मागणी केली आहे