Shreyas Talpade पुन्हा ओरडणार 'ऍक्शन'; 'सर'कार' की सेवा में' म्हणत प्रेक्षकांच्या सेवेस होणार रुजू
Shreyas Talpade | (Instagram)

मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आता पुन्हा एकदा ऍक्शन म्हणण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रेयस दिग्दर्शक म्हणून आपला दुसरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'सर'कार' की सेवा में' (Sir'Car ki Seva Mei) असं नाव असलेल्या या सिनेमाचं चित्रीकरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होत आहे. श्रेयस सोबतच या सिनेमात श्रद्धा जैस्वाल, सुधीर पांडे, चेतना पांडे, ब्रिजेंद्र काला, सुशील सिंग यांच्या सहाय्यक भूमिका असतील.

हरिहरन ऐय्यर आणि राज भट्टाचार्य यांची सहनिर्मिती असलेल्या या सिनेमाबद्दल बोलताना निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणारे ऐय्यर म्हणाले,''ही कथा आम्हाला खुप आवडली. भट्टाचार्यांनी ऐकवल्या या कथेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आम्हाला प्रचंड भावला. मी आधीपासूनच एक चित्रपट रसिक असल्या कारणाने आम्ही या क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतला आणि आता आम्ही या सिनेमाची निर्मिती करत आहोत.'' (हेही वाचा. धक्कादायक! श्रेयस तळपदे च्या पत्नीच्या नावाने सोशल मिडीयावर मोठी फसवणूक; लोकांना सावध राहण्याचे आवाहन)

श्रेयस तळपदेने या आधी सिनेमाचे वेगवेगळे पैलू हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2008 साली आलेल्या 'सनई चौघडे'च्या माध्यमातून त्याने निर्मितीमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर त्याने 'पोस्टर बॉईज' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. जो महाराष्ट्रामध्ये सुपरहिट ठरला. त्यानंतर त्याने 'बाजी' या चित्रपटात सुद्धा अभिनयाबरोबरच निर्मितीची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर 2017 मध्ये आलेल्या पोस्टर बॉईजच्या हिंदी रिमेकद्वारे त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता अशा तिन्ही जबाबदाऱ्या पेलणाऱ्या श्रेयसचा दिग्दर्शनातील हा दुसरा प्रयत्न किती यशस्वी होतो हे बघावं लागेल.