धक्कादायक! श्रेयस तळपदे च्या पत्नीच्या नावाने सोशल मिडीयावर मोठी फसवणूक; लोकांना सावध राहण्याचे आवाहन
श्रेयस आणि दीप्ती तळपदे (Photo Credits: Instagram)

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे ( Shreyas Talpade) याचे मोठे नाव आहे. श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदे (Deepti Talpade) देखील मोठी निर्माती आहे. नुकताच या जोडप्याला एक धक्कादायक अनुभव आला, त्याची माहिती श्रेयसने चाहत्यांना दिली आहे. तर श्रेयसची पत्नी दीप्तीच्या नावाने सोशल मिडीयावर मोठा फ्रॉड चालू आहे. एका व्यक्तीने दीप्ती यांच्या नावाने खोटे खाते बनवून, आपण दीप्ती, अॅमेजॉनची कास्टिंग डिरेक्टर असल्याचे भासवत लोकांकडून त्यांचे प्रोफाईल मागण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत श्रेयसने चाहत्यांना विनंती केली आहे की, त्यांनी अशा कोणत्याही भूलथापांना अथवा खोट्या अकाऊंट्सना बळी पडू नये. श्रेयसच्या एका मित्राने अशा प्रकार चालू असल्याची माहिती दिली. दीप्ती आणि श्रेयसने जेव्हा याची सत्यता पडताळून पहिली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आता श्रेयसने लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा: पत्रकारासोबत झालेल्या वादानंतर कंगना रनौत हिची माफी नाही, व्हिडिओतून मांडले मत)

याबाबत श्रेयस म्हणतो, ‘दीप्ती एक स्वतंत्र निर्माती असून, तिने काही उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र ती अॅमेजॉनची  कास्टिंग डायरेक्टर नाही. मला आशा आहे की अशा कोणत्याही व्यक्तीकडून तुमची फसवणूक होणार नाही.’ दीप्तीने याआधी पोस्टर बॉयज, बाजी आणि सनई चौघडे अशा मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.