Sushant Singh Rajput चा आता 'हा' चित्रपटही लांबणीवर; पुढच्या वर्षी होऊ शकतो प्रदर्शित
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) अजून एक चित्रपट आता लांबणीवर पडला आहे. 'दिल बेचारा' असे नाव असलेला हा चित्रपट 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. पण शेवटच्या क्षणी करण्यात आलेल्या काही बदलांमुळे आणि पोस्ट प्रोडक्शनला लागणाऱ्या वेळेमुळे पुढच्या वर्षी ढकलण्यात आला आहे. 2020 च्या सुरवातीला आता हा प्रदर्शित होईल असा अंदाज आहे.

'दिल बेचारा' हा चित्रपट कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राचं दिग्दर्शनातील पदार्पण म्हणून चर्चेत होता. तसेच हा हॉलीवूडच्या प्रसिद्ध अशा 'द फॉल्ट इन अवर स्टार्स'चा अधिकृत रिमेक आहे. सुशांतच्या सोबत संजना संघी ही अभिनेत्री पदार्पण करणार आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट नेटफ्लिक्स किंवा प्राईमला स्ट्रीमिंग साठी विकला जाऊ शकतो अशीसुद्धा चर्चा होती. पण निर्मात्यांनी ती फेटाळून लावत हा चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार असल्याचं विधान केले आहे. (हेही वाचा. 'Drive' ची बंद पडलेली गाडी अखेर मार्गावर; Netflix वर होणार रिलीज)

तसे न झाल्यास मात्र सुशांतसाठी हा धक्का असू शकतो. सुशांतचे बरेचसे चित्रपट गेल्या दोन वर्षात रखडले आहेत, लांबणीवर पडले आहेत आणि काही तर बंदच झाले आहेत. शेखर कपूर सोबत तो 'पानी' करणार होता. पण तो बंदच झाला. तर दुसरीकडे 'चंदा मामा दूर के' नावाचा एक चित्रपट ज्यात तो अंतराळवीराची भूमिका करणार होता तोही बंद झाला.

'ड्राइव्ह'ची गाडी रडत खडत कशी बशी वाटेला लागली. त्यासाठी पण त्याला 2 वर्ष थांबावं लागलं. 'केदारनाथ'च्या वेळी सुद्धा निर्माता दिग्दर्शकाच्या वादामुळे खूप अडचणी आल्या. पण सुदैवाने तो चित्रपट प्रदर्शित झाला आणि हिटही झाला. या वर्षाच्या सुरवातीला आलेला 'सोनचिरिया' हा चांगला चित्रपट असूनही बॉक्स ऑफिस वर सपशेल अपयशी ठरला. या वर्षी आलेल्या 'छिछोरे'ने ,मात्र त्याला अपेक्षित यश मिळवून दिले. आता 'दिल बेचारा' ड्राइव्हच्या मार्गे न जात छिछोरेच्या मार्गाने जावा हीच त्याची अपेक्षा असेल.