'Drive' ची बंद पडलेली गाडी अखेर मार्गावर; Netflix वर होणार रिलीज
Sushant Singh Rajput Jacqueline Fernandez | (Picture Credit: Instagram)

'ड्राईव्ह' (Drive) चित्रपटाच्या गाडीला अखेर प्रदर्शनाचा मार्ग सापडला आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेला हा चित्रपट आता 1 नोव्हेंबर पासून नेटफ्लिक्स (Netflix) वर पाहता येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने (Karan Johar) केली आहे.

तरुण मनसुखानी दिग्दर्शित 'ड्राईव्ह' हा चित्रपट मागच्या वर्षी सप्टेंबरलाच प्रदर्शनासाठी सज्ज होता. पण निर्माता करण जोहरला चित्रपटाचं अंतिम स्वरूप न आवडल्याने त्याने काही दृश्य पुन्हा चित्रित करायला लावली. त्यानुसार पटकथेत थोडे बदल करून काही प्रसंगांच रिशूट झालं. नंतर हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित करायचा असं ठरलं. परंतु करण जोहर अद्यापही चित्रपटाच्या अंतिम प्रॉडक्ट बद्दल समाधानी नसल्याने हा चित्रपट पुन्हा पुढे ढकलला गेला. आता हा प्रदर्शित होतो की नाही इथपर्यंत गोष्टी पोचल्यानंतर अखेर करणने ह्या चित्रपटाचे वितरक म्हणून नेटफ्लिक्सला पाचारण केलं आणि आता थेट नेटफ्लिक्सवर हा चित्रपटात पाहता येणार आहे. कालच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. (हेही वाचा. नेटफ्लिक्स वरील 'मिसेज सीरियल किलर' या आगामी वेबसिरीजमधून जॅकलिन फर्नांडिस करणार डिजिटल डेब्यू)

सुशांत सिंग रजपूत (Sushant Singh Rajput) आणि जॅकलिन फर्नांडेज (Jacqueline Fernandez) ही फ्रेश जोडी ह्या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तर बोमन इराणी (Boman Irani) पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), सपना पब्बी यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. एका कुप्रसिद्ध 'किंग'च्या 300 किलो सोन्यासाठी चाललेला पाठलाग आणि एका भूमिगत एजन्टने या 'किंग'ला पकडण्यासाठी एका रेसिंग गॅंग सोबत केलेली हातमिळवणी ही या चित्रपटाची कथा आहे.