![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/10/FotoJet-33-1-380x214.jpg)
दिवाळी स्पेशल आठवड्यात ‘हिरकणी’ (Hirkani) आणि ‘ट्रिपल सीट’ (Triple Seat) असे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. परंतु बॉलीवूडमधील एक बिग बजेट सिनेमा ‘हाऊसफुल 4’ (Housefull 4) देखील याच आठवड्यात प्रदर्शित होत असल्याने दोन्ही मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याच्या तक्रारी चित्रपट निर्मात्यांनी केल्या आहेत.
याला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'साहेबांच्या भाषेत सांगितले तर तुम्हाला जास्त पटेल' असा इशारा थिएटर मालकांना दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंबंधीत एक पत्र आज थिएटर मालकांना लिहिले आहे. काल त्यांनी 'हिरकणी' चित्रपटाला थिएटर न मिळाल्यास काचा फुटणार, असा इशारा दिला होता.
अमेय खोपकर यांनी चित्रपटगृह मालकांना आपल्या पत्रात लिहिले आहे की, “हिरकणी आणि ट्रिपल सीट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांचा अथक प्रयत्न चालू आहे. पण चित्रपटगृह उपलब्ध नाही असे ठोकळेबाज उत्तर प्रत्येक ठिकाणी मिळत आहे. पण मग बाकी निर्मात्यांनी काय करायचे? कुठे जायचे? ही अशी मोनोपोली जर हिंदी निर्माते करणार असतील तर मराठी निर्मात्यांनी काय करायचे?”.
'हिरकणी' व 'ट्रिपल सीट' ह्या मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात हक्काच्या वेळा, स्थान मिळणार नसेल तर...
"आपण आपले चित्रपटगृह महाराष्ट्राच्या भूमीत चालवता ह्याचा आपल्याला विसर पडला असावा..." मनसे उपाध्यक्ष @MNSAmeyaKhopkar ह्यांचं चित्रपटगृह मालकांना स्मरणपत्र.#मनसेदणका pic.twitter.com/E6bIFBHkAr
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 23, 2019
Hirkani सिनेमाला थिएटर द्या नाहीतर... महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची थिएटर मालकांना धमकी
इतकेच नव्हे तर, “येणाऱ्या सर्व चित्रपटांना संधी देणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत. तुम्ही म्हणाल की हा आमचा प्रश्न आहे. आम्ही जे हवे ते करु…मग नीट ऐका. महाराष्ट्राची अस्मिता जपणे आणि मराठी चित्रपटांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा आमचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी आम्ही जे हवे ते करु. आम्ही समंजस आहोत, सहनशील आहोत म्हणजे दुर्बल आहोत याचा असा गैरसमज तुम्ही करुन घेतला असेल तर तो चुकीचा आहे,” असेही अमेय खोपकर यांनी पत्रात लिहिले आहे.