Kaagar Trailer: 'कागर' सिनेमाचा ट्रेलर आऊट; 'जुनं जाणार तेंव्हाच नवं येणार' म्हणत दमदार राजकारण्याच्या भूमिकेत 'रिंकू राजगुरू'
Kaagar ( Photo Credits: Instagram)

Rinku Rajguru's Movie Kaagar Trailer: 'सैराट' (Sairat) या मराठी सिनेमातील दमदार अभिनयाने देशा-परदेशात पोहचलेली रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) तीन वर्षांनी पुन्हा मराठी रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. 'कागर' (Kaagar) या रिंकूच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सोबत शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) हा नवोदित अभिनेता पदार्पण करत आहे. 'कागर'च्या टीझर आणि सिनेमातील 'लागिलिया गोडी तुझी' या पहिल्या गाण्यानंतर रसिकांना 'कागर'च्या ट्रेलरची (Kaagar Trailer)  प्रतिक्षा होती. ग्रामीण राजकारण आणि प्रेम याच्या संघर्षात फुलणारी प्रेमकहाणी हा या सिनेमाचा आशय आहे. Kaagar Movie Official Teaser; पाहा रिंकू राजगुरु हिचा नवा अंदाज (व्हिडिओ)

दमदार ट्रेलर

'कागर'मधून ग्रामीण राजकारण, नव्या नेतृत्त्वाचं आगमन सोबत प्रेमामध्ये होणारा संघर्ष याचं चित्रण करण्यात आलं आहे. रिंकू या सिनेमात 'राणी' ही भूमिका साकारत आहे. 'कधी कधी शर्यत जेथून सुरू होते तिथेच येऊन संपते' या रिंकूच्या डायलॉगमध्येच या सिनेमाच्या कथेचा अंदाज येतो. अनपेक्षितपणे घरात राजकारणाचा वारसा असलेल्या राणीचा (रिंकू) राजकारणामध्ये प्रवेश होतो. राजकीय डावांमध्ये राणी आणि तिचा प्रियकर कुठल्या वळणावर येऊन ठेपतं याची झलक ट्रेलरमध्ये पाहता येते. रिंकूचा पुन्हा दमदार अभिनय, नवं स्वावलंबी स्त्री पात्र 'कागर' सिनेमात पाहता येणार आहे.

कागर सिनेमा हा मकरंद माने दिग्दर्शित आहे. या सिनेमात रिंकू आणि शुभंकर ही प्रमुख जोडी आहे. हा सिनेमा 26 एप्रिल 2019 दिवशी रीलिज होणार आहे.