Institute Of Pavtology Movie: 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'ची निवड पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र
इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी पोस्टर (Photo Credit - Insta)

तब्बल 250 हून अधिक कलाकारांचा समावेश असलेला 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' (Institute Of Pavtology) या चित्रपटाची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Pune International Film Festival) निवड झाली आहे. दिग्दर्शक प्रसाद नामजोशी (Prasad Namjoshi) आणि सागर वंजारी (Sagar Vanjari) यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाही येणार आहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची' निर्मिती फटमार फिल्म्स एलएलपीच्या नेहा वंजारी, प्रसाद नामजोशी, यांनी केली आहे. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. सागर वंजारी आणि प्रसाद नामजोशी या दोन्ही दिग्दर्शकांचे या पूर्वीचे चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवले गेले असल्यानं 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या चित्रपटाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांच्यासह दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सागर वंजारी यांनी संकलन, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन, गिरीश जांभळीकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. (हे ही वाचा Swaranjali Shinde: शिंदे घराण्यातील स्वरांजलीचं संगीत क्षेत्रात पदार्पण, म्युझिक व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवर लाँच)

गेली दोन वर्षं 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या चित्रपटाचं काम सुरू होतं. आता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाद्वारे पहिल्यांदाच दोन वर्षांची मेहनत पडद्यावर येणार असल्याचा आनंद आहे. अतिशय वेगळा आशयविषय असलेला हा चित्रपट हाताळणे काहीसे अवघड होते. मात्र ही कामगिरी आता पार पडली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानंतर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा मानस आहे, असे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी सांगितले.