Swaranjali Shinde: शिंदे घराण्यातील स्वरांजलीचं संगीत क्षेत्रात पदार्पण, म्युझिक व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवर लाँच
Swaranjali Shinde (Photo Credit - Insta)

ना सांगता ना बोलता छंद लागला तुझा, समजना उमजना सावरू कसा मना' अशी मनोवस्था व्यक्त करणारा "सांग रे मना...." हा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे, आजवर अनेक हिट गाणी दिलेल्या शिंदे घराण्यातील स्वरांजली शिंदे (Swaranjali Shinde) "सांग रे मना..." या गाण्याद्वारे म्युझिक व्हिडिओतून संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे. सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांची ती कन्या आहे. सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांची प्रस्तुती असलेल्या "सांग रे मना" या म्युझिक व्हिडिओची निर्मिती एसआरवाय प्रॉडक्शनने केली आहे. रुपेश खांदर या नव्या दमाच्या संगीतकारानं या गाण्याला संगीत दिलं आहे.

तसंच स्वरांजलीसह त्यांनी गाणं गायलही आहे. तर सुहास रुके आणि माऊली कोळी या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. सप्तसूर म्युझिकने आतापर्यंत अनेक नव्या दमाच्या कलाकारांना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. त्यात आता सांग वे मना या म्युझिक व्हिडिओचीही भर पडली आहे. शिंदे घराण्यानं आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. या घराण्यातली स्वरांजली ही पहिली गायिका आहे. त्यामुळेच सांग रे मना हा म्यूझिक व्हिडिओचं वेगळं महत्त्व आहे.

प्रेमामध्ये आकंठ बुडालेल्या प्रेमिकांच्या भावना सांग रे मना या गाण्यात मांडण्यात आल्या आहेत. तसंच उत्तम चित्रीकरण, उत्तम कलाकारही यात असल्यानं म्युझिक व्हिडिओही जमून आला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रेमिकाची सांग रे मना ही भावना आता सुरेल आणि देखण्या पद्धतीनं चित्रीत झाली आहे. सहजसोपे शब्द आणि तितकंच श्रवणीय संगीत असल्यानं हे गाणं तमाम तरुणांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.