Fatteshikast Trailer: शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीसह तलवारीने गाजवलेला पराक्रम दाखवणारा फत्तेशिकस्तचा तळपता ट्रेलर
Fatteshikast Trailer (Photo Credit : Youtube)

मराठी चित्रपट सृष्टीला ऐतिहासिक चित्रपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. इतिहासातील घटनांचा ऐवज सध्या फक्त पुस्तकरुपात उपलब्ध आहे. मात्र दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) सारखा तरुण दिग्दर्शक आज इतिहासातील ही सोनेरी पाने आपणासमोर मोठ्या पडद्यावर उलगडत आहे. ‘फर्जंद’च्या अमोघ यशानंतर आता ‘फत्तेशिकस्त’च्या (Fatteshikast) रूपाने मराठी इतिहासातील पहिला ‘सर्जिकल स्ट्राईक’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनितीचे दर्शन या चित्रपटात घडणार आहे.

Fatteshikast Trailer -

ट्रेलरमध्ये स्वराज्यावर शाहिस्तेखानाचे आलेले संकट आणि त्याचा शिवाजी महाराजांनी केलेला खात्मा  या दरम्यानच्या गोष्टींचे दर्शन घडते. या ट्रेलरमधील महत्वाची आणि आकर्षित करून घेणारी गोष्ट म्हणजे याचे छायाचित्रण. उत्तम कॅमेरा अँगल्स, अचूक प्रकाश योजना, कला दिग्दर्शन यामुळे हा ट्रेलर पाहताना आपण स्वतः तो काळ अनुभवत असल्याचा भास होतो. संवादासाठी अगदी तोलून मापून केलेली अचूक शब्दांची निवड हे या चित्रपटाचे एक वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. त्यात कसललेल्या कलाकारांच्या तोंडी ती वाक्ये एकून उरात शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्याबद्दल एक सार्थ अभिमानात निर्माण होतो.

मराठीमध्ये तसे फार कमी ‘मारधाडपट’ बनतात. त्यात ऐतिहासिक चित्रपट हे अॅक्शनशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे इतिहासातील घटना जाणून घेण्यासोबतच उत्तम ‘अॅक्शनपट’ पाहायचा असेल तर ‘फत्तेशिकस्त’ हा चांगला पर्याय ठरू शकतो. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर याने शिवाजी महाराजांची भूमिका निभावली आहे, तर जिजाऊंच्या भूमिकेत आहेत चतुरस्र अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. सोबत निखिल राऊत, अनुप सोनी, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या अनेक मातब्बर कलाकारांनी या चित्रपटात आपल्या भूमिकेची छाप उमटवली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. येत्या 15 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.