
दिवाळी या सणाची सर्वच जण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. काहीच दिवसांवर असलेली ही दिवाळी म्हणजे उत्साह, चैतन्य, आणि आनंदाचा सण. या सणासोबत अनेक जुन्या रूढी, परंपराही जोडल्या गेल्या असतात. त्यातीलच एक म्हणजे किल्ले बांधण्याची जुनी प्रथा. लहानांसोबत मोठेही त्यात आंनदाने सहभागी होतात आणि अनेक ठिकाणी दिवाळीच्या एक आठवड्यापूर्वी किल्ले बांधणीच्या कमला सुरुवात होते. ही प्रथा चालू राहावी म्हणून ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या कलाकारांनी किल्ले बांधणीची मोहिम हाती घेत जुन्या प्रथेला उजाळा दिला.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, आस्ताद काळे, अजय पुरकर, हरिश दुधाडे, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, अक्षय वाघमारे, मृण्मयी देशपांडे, तृप्ती तोरडमल, रुची सावर्ण, नक्षत्रा मेढेकर या कलाकारांनी किल्ले बांधणीच्या उपक्रमाला हजेरी लावली होती.

पराक्रमाचे, शौर्याचे इतिहासाचे प्रतीक असलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत ही पोहोचावा या उद्देशाने चित्रपटही कलाकारांनी किल्लेबांधणीचा हा अनोखा उपक्रम राबवला आहे.

‘फत्तेशिकस्त’ हा आगामी सिनेमा ऐतिहासिक कथानकावर आधारित असणार आहे व येत्या १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनितीचे दर्शन या चित्रपटात घडणार आहे. चिन्मय मांडलेकर याने शिवाजी महाराजांची भूमिका निभावली आहे, तर जिजाऊंच्या भूमिकेत आहेत चतुरस्र अभिनेत्री मृणाल कुलकर्णी.