Ashok Saraf Birthday Special: लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस; पहा या विनोदाच्या बादशाह बाबत काही Interesting Facts
Ashok Saraf (Image Credit: Stock Photo)

अशोक सराफ (Ashok Saraf) हे विनोदाच्या बाबतीत मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक नावाजलेले नाव. आज अभिनेते अशोक सराफ यांचा वाढदिवस. 4 जून 1947 रोजी अशोक मामांचा जन्म झाला. अशोक सराफ मुळचे बेळगावचे असून दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचे बालपण गेले. 1971 सालचा ‘दोन्हीं घरचा पाहुणा’ हा अशोक सराफ यांचा पहिला, ज्यामुळे लोक त्यांना ओळखू लागले. मात्र 1975 च्या दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवलदार’ चित्रपटापासून त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त पाहूया त्यांच्याबाबत काही Interesting Facts

  • अशोक सराफ यांनी डीजीटी विद्यालय मुंबई येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. मराठी व हिंदीमधील नावाजलेली अभिनेत्री निवेदिता सराफ या त्यांच्या पत्नी. या दोघांमध्ये 18 वर्षांचे अंतर आहे. त्यांना अनिकेत सराफ नावाचा एक मुलगा आहे, जो शेफ आहे.
  • 1969 पासून अशोक सराफ चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी 250 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून त्यापैकी 100 व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले आहेत.
  • वयाच्या 18 व्या वर्षी शिरवाडकर यांचे मराठी नाटक, ‘ययाती आणि देवयानी’ नाटकातून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीत पाऊल ठेवले. 1969 मध्ये 'जानकी' चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
  • साधारण 25 वर्षांपूर्वी अशोक सराफ यांचा मोठा कार अपघात झाला होता. त्यावेळी ते मृत्युच्या दाढेतून परत आले होते. यामध्ये त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांना सुमारे सहा महिने विश्रांती घेण्यास सांगण्यात आले. पुढे गणेश चतुर्थीच्या दिवशी सहा महिन्यांनंतर त्यांनी आपला पुढील चित्रपट, ‘मामाला पोरिचा’ चे शूटिंग सुरू केले.
  • 'पांडू हवालदार' , 'कळत नकळत', 'भस्म', 'वजीर', 'चौकट राजा' या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डेबरोबरची त्यांच्या जोडीने धमाल उडवून दिली होती. या जोडगोळीचा 'अशी ही बनवाबनवी' चित्रपट अजूनही एव्हरग्रीन समजला जातो.
  • हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. मात्र 'हम पांच' या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेमुळे देशात घराघरात पोहोचले.
  • अशोक सराफ यांनी पत्‍नी निवेदिता जोशी-सराफसोबत निर्मिती संस्थाही स्थापन केली होती. त्याद्वारे 'टन टना टन' (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. (हेही वाचा: आशुतोष पत्की कडून तेजश्री प्रधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'स्पेशल पोस्ट' आणि 2 खास टीप्स; चाहत्यांमध्ये 'डेटिंग'ची चर्चा)

तर असा हा विनोदाचा बादशाह अशोक सराफ यांना लेटेस्टली मराठीकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा