Game of Thrones Season 8 Teaser : जॉन स्नो, सान्सा स्टार्क आणि आर्या स्टार्क शेवटच्या लढाईस सज्ज; 14 एप्रिलला येणार पहिला एपिसोड
गेम ऑफ थ्रोन्स (Photo Credits: YouTube)

फ्रेंड्स (Friends) नंतर सर्वात लोकप्रिय झालेली सिरीज म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (Game of Thrones). जॉर्ज आर. आर. मार्टिन (George R. R. Martin) यांच्या पुस्तकावर आधारित ही सिरीज गेली 8 वर्षे चालू आहे. 2017 मध्ये याचा सातवा सिझन आला होता. त्यांनतर जवळजवळ संपूर्ण जगामध्ये याच्या पुढच्या म्हणजेच 8 व्या सिझन बद्दल विचारणा होत होती. मात्र आता प्रतीक्षा संपली आहे, याच्या 8 व्या आणि शेवटच्या सिझनचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या 14 एप्रिलला या शेवटच्या सिझनचा पहिला एपिसोड प्रदर्शित होणार आहे. 90 सेकंदाच्या या टीझरमध्ये स्टार्क कुटुंबातील मुख्य पात्रे दिसून येतात.

टीजरच्या सुरुवातीला जॉन स्नो (Jon Snow) हातात एका मशाल घेऊन एका गुफेत शिरताना दिसतो. त्यानंतर सान्सा स्टार्क (Sansa Stark) त्याला येऊन भेटले, शेवटी आर्या स्टार्क (Arya Stark) ही सुद्धा या दोघांना भेटले. तिघे चालत चालत पुढे जातात, आणि त्यांना दिसतात ते या तिघांचे पुतळे. अचानक जॉनच्या हातातील मशाल विझते, त्यावेळी या तिघांना तिथे अजून कोणीतरी असल्याची जाणीव होते. त्याचबरोबर तिघांचाही हात आपल्या तालावारीकडे जातो, आणि हे सज्ज होतात ही मुकुटाची लढाई लढण्यासाठी.

'गेम ऑफ थ्रोन्स' ही एक काल्पनिक कथा आहे. संपूर्ण प्रदेशावर सत्ता स्थापनेसाठी, राजगादीवर बसून, राजाचा मुकुट प्राप्त करण्याची ही लढाई आहे. निर्दयी पात्रे, मुकुटाचा हव्यास, रक्तपात, खून, सेक्स, कुटुंब, भावना, नाती अशा सर्वांचे मिश्रण असलेली ही मालिका त्याच्या कथेमुळे, स्क्रीनप्लेमुळे, दिग्दर्शनामुळे अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. तब्बल एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या मालिकेचा शेवटचा सिझन येत आहे, याचा आनंदही आहे, मात्र यामध्ये फक्त सहाच एपिसोड आहेत याचे दुखःही आहे. या मालिकेत लेना हेडी (Lena Headey), एमिलिया क्लार्क (Emilia Clarke), किट हॅरिंगटन (Kit Harington), सोफी टर्नर (Sophie Turner), मॅसी विलियम्स (Maisie Williams) या काही कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. आता प्रेक्षकांना प्रतीक्षा असेल ती 14 एप्रिलची.