नागपूरच्या नयना गाडे हिची हॉलिवूड भरारी, वयाच्या पंचवीशीत घेतली गरुड झेप
Creative Director | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

यशाला वयाचं बंधन नसतं. फक्त तुमची स्वप्नं आणि त्या प्रति केलेले प्रयत्न प्रामाणीक असायला हवेत. सोबत त्या प्रयत्नांना योग्य दिशाही हवी. बस्स! तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही. उदाहरणच द्यायचे तर, महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) शहरातील तरुणी नयना गाडे (Nayana Gade) हिचे घेता येईल. आपल्यापैकी अनेकांची करिअर प्रादेशिक चित्रपटसृष्टी अथवा फारफार तर बॉलिवूडपर्यंत संपत असली तरी, नयना हिने मात्र प्रयत्नांच्या आणि संघर्षाच्या जोरावर थेट हॉलिवूड (Hollywood) पर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे तिने ही मजल केवळ वयाच्या पंचवीशीत मारली हे उल्लेखनीय.

बॉलिवुड अभिनेत्री फरीदा जलाल ही नयना हिची प्रेरणा. फरीदा जलाल हिच्या अभिनयाने प्रभावीत होऊन आपणही चित्रपटसृष्टीतच काम करायचे ही खुणगाठ नयनाने लहानपणीच बांधली होती. आज तिचे स्वप्न पूर्ण होत आहे. नयना गाढे ही हॉलिवुडमध्ये असोसिएट प्रोड्युसर आणि क्रियेटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करणार आहे. इतक्या अल्पवयात इतकी मोठी मजल मारल्याबद्दल नयना ही सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.

नयनाच्या बालपणाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, तिचे सुरुवातीचे शिक्षण नागपूर आणि आमरावती येथे झाले. बालपणीच्या आयुष्यात कधीतरी तिने 'शरारत' नावाचा अभिनेत्री फरीदा जलाल हिचा चित्रपट पाहिला. या चित्रपटात फरीदा जलाल हिचा अभिनय पाहून नयना प्रभावीत झाली. इतके की पुढे आपण चित्रपटसृष्टीच काम करायचे हे तिने पक्के ठरवून टाकले. नयानाने इयत्ता बरावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि थेट मुंबई गाठली. मुंबईत तिने बॅचलर ऑफ मास मीडियाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. (हेही वाचा, करिअर निवडण्यापूर्वी हे '४' प्रश्न स्वतःला अवश्य विचारा !)

बॅचलर ऑफ मास मीडियाचा अभ्यासक्रमात नयना हिने नाटक व फिल्म मेकिंगचे तंत्र आत्मसात केले. शिक्षण घेत असतानाच तिने काही नाटकं आणि लघुपट आदींची निर्मिती केली. या काळात तिला काही होतकरु आणि तरुण दिग्दर्शकांचे सहकार्य भेटले. दरम्यान, तिच्या करीअरला अधिक उभारी देणारी आणखी एक महत्त्वाची घटना घडली. तिला बीबीसीच्या 'व्हॉट नॉट टू विअर' या शोमध्ये सहायक निर्माती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीमुळे तिला पुढे काम मिळण्याचा रस्ता सापडला पुढे पुढे तो अधिकच विस्तारत गेला. तिला 'नच बलिये', 'झलक दिखलाजा' आदी शोंच्या पोस्ट प्रॉडक्शन टीममध्ये काम करण्याची संधी मिळाली.

महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, नयना गाडे हिने न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमी फिल्म प्रोड्युसिंग इन्स्टिट्यूटमधून 'मास्टर ऑफ फाइन आर्ट्स इन प्रोड्यूसिंग प्रोग्रॅम' दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दरम्यान, 'शुगर' सिनेमासाठी एक्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम केल्यावर सध्या ती 'दे केम अॅज स्लेव्हज' ही टीव्ही मालिका तसेच, ' स्नॅप्ड' या चित्रपटाची प्रोड्यूसर, रायटर आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे.