हॉलीवूडची ख्यातनाम गायिका केटी पेरी (Katy Perry) मुंबईत दाखल झाली आहे. 16 नोव्हेंबरला मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये केटी पेरी परफॉर्मन्स देणार आहे. या कार्यक्रमात केटीसोबत दुआ लिपा आणि अन्य नामांकित सेलिब्रिटींचाही परफॉर्मन्स होण्याची शक्यता आहे. यावेळी केटी पेरी दुसऱ्यांदा भारतात आली आहे. महत्वाचे म्हणजे प्रथमच भारतात ती आपली कला सादर करणार आहे. केटीच्या या परफॉर्मन्सची लाखो चाहते उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत. मंगळवारी सकाळी केटी पेरी क्रूसमवेत भारतात दाखल झाली. एअरपोर्टवर केटी पेरीचा लूक पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोकेच वाढले होते. सध्या सोशल मिडीयावर केटीच्या या आगमनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
केटी पेरीने रोर, डार्क होर्स आणि कॉन कामा यासह अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. दिलेल्या निवेदनात केटी पेरी म्हणते, ‘भारतात येऊन मला खूप आनंद झाला आहे आणि मी मुंबईत प्रथमच गायन करणार आहे, ज्याबद्दल मी खूप उत्सुक आहे.’ केटी पेरी यापूर्वीही भारतात आली आहे. 2012 मध्ये, केटी पेरी टी -20 लीगच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्यासाठी भारतात आली होती. यावेळी केटी पेरी 16 नोव्हेंबर रोजी वनप्लस संगीत महोत्सवात प्रथमच धमाल उडवून देणार आहे.
चीनची प्रीमियम स्मार्टफोन निर्माता कंपनी वन प्लसने यंदा मुंबईत वनप्लस म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. केटी पेरी तसेच दुआ लीपा, रित्विज आणि लोकल ट्रेन बँड सिंगर वन प्लस म्युझिक फेस्टिव्हल 2019 मध्ये कला सादर करतील. केटी पेरीला पाहण्यासाठी देशभरातील हजारो चाहत्यांनी आधीच तिकिटे विकत घेतली आहेत.